सहायक जिल्हाधिकारी भारूड यांची मुलाखतीत माहिती

इंग्रजी येणे किंवा न येणे यावर तुमचे मोठेपण अथवा खुजेपण सिद्ध होत नाही. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यायची म्हणजे सर्व सोडून अभ्यास एके अभ्यासच करावा लागतो असे नसून नियोजनपूर्वक केलेला ५-६ तासांचाही लक्ष लावून केलेला अभ्यास यश मिळवून देण्यासाठी पुरेसा आहे, असे सांगून अधिकारी झाल्यानंतर किनवटसारख्या आदिवासी बहुल भागातील मुलांना लहानपणापासून दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले.

आज ३५० अंगणवाडय़ा, शाळांना आयएसओचा दर्जा मिळाला असून १०० गावांमध्ये शुद्ध पाण्याची यंत्रणा बसवण्यात आल्याची माहिती किनवटचे सहायक जिल्हाधिकारी व माहूरगड देवी संस्थानचे सरचिटणीस डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिली.

येथील संत तुकाराम नाटय़गृहात रविवारी वेध व्यवसाय प्रबोधन परिषदेच्या १० व्या वर्षांनिमित्त आयोजित ‘वेध-२०१७, उत्सव जीवनाचा’ या कार्यक्रमात प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीदरम्यान ते बोलत होते. या कार्यक्रमात औरंगाबादचा भूमिपुत्र तथा स्वतची कंपनी उघडून अमेरिकेतील न्यूजर्सी येथे काम करत असलेला मुक्तक जोशी, एव्हरेस्टवीर शेख रफीक, ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, जम्मू-काश्मीरमध्ये अनाथ मुलांसाठी काम करणारे अधिक कदम, अभिनेत्री पूर्वा नीलिमा सुभाष, देविका वैद्य आदींच्याही प्रकट मुलाखती घेण्यात आल्या.

डॉ. नाडकर्णी यांनी डॉ. भारूड यांना बोलते केले. यावेळी डॉ. भारूड यांनी धुळे जिल्ह्य़ाच्या साक्री तालुक्यातील शिक्षणापासून दूर असलेल्या भिल्ल समाजात झालेला जन्म ते सहायक जिल्हाधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला. ध्येय गाठण्यासाठी परिस्थिती, गरिबी, अडचणींचे कारण पुढे केले जाते. वास्तविक गरिबी ही एक मानसिक अवस्था आहे, असेही भारूड म्हणाले.

एव्हरेस्टवीर शेख रफीक यांनी ध्येय मोठे असेल आणि ते गाठण्याचा निर्धार केलेला असेल तर त्या मार्गातील अडथळे खुजे वाटतील, असे सांगितले, तर औरंगाबादने शैक्षणिक, उत्तम पुरोगामी व नाटय़कलेचा वारसा दिला, असे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले.

अधिक कदमचा सन्मान

यावेळी जम्मू-काश्मीरमधील पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात अनाथ मुलांसाठी काम करणारे अधिक कदम यांना रोख रक्कम, सन्मानपत्र, असे स्वरूप असलेल्या पाचव्या वेध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ते म्हणाले, तब्बल १९ वेळा अतिरेक्यांनी उचलून नेले. त्यानंतरही सोडून दिले. जोपर्यंत तुम्ही निर्मळ होणार नाहीत तोपर्यंत माणसं बदलणार नाहीत. निर्मलता ही शक्ती आहे. स्वतला शोधायला निघालो तेव्हा सेवेचा मार्ग सापडला. खरं तर ही समाजसेवा नाही. ते आहे स्वतला शोधणे. त्यामुळे मला मोठेपण देऊ नका, असे अधिक म्हणाले. दूर राहणाऱ्यांना मदत करायची असेल तर काय करावे, या डॉ. नाडकर्णीच्या प्रश्नावर अधिक म्हणाले, मदत करू इच्छिणाऱ्यांनी माणूस म्हणून माणसांसाठी प्रार्थना केली तरी तेही खूप आहे.