सरकारी लसकेंद्रे ओस

औरंगाबाद : करोना संसर्गाची तिसरी लाट रोखायची असेल, तर लसीकरणाची गती वाढवावी लागेल, अशा सूचना वारंवार दिल्या जात आहेत. मात्र केंद्र शासन लशींचा साठाच देत नसल्याने शहरातील लसीकरण केंद्र ओस पडले आहेत तर दुसरीकडे खासगी रुग्णालयांकडे मात्र तब्बल ३८ हजार लशींचा साठा शिल्लक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांना नाइलाजाने पैसे मोजून लस घ्यावी लागत आहे.

करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरली असली, तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी प्रशासनातर्फे केली जात आहे. १८ ते ४४ वर्षांवरील नागरिकांचे गतीने लसीकरण झाल्यास तिसऱ्या लाटेचा धोका कमी होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे शासनातर्फे लसीकरणाची गती वाढविण्याचे आदेश दिले जात आहेत. पण दुसरीकडे लशीच मिळत नसल्याने आठवडय़ातले एक-दोन दिवसच लसीकरण होत असून, उर्वरित दिवशी केंद्र बंद राहत आहेत. नागरिक लस कधी येणार? याची विचारणा करण्यासाठी केंद्रावर चरका मारत असल्याचे चित्र आहे. एकीकडे सरकारी लसीकरण केंद्र बंद असताना खासगी रुग्णालयांना थेट कंपनीकडून लस खरेदी करून ती नागरिकांना देण्याची परवानगी केंद्र शासनाने दिली आहे.  काही दिवसांपासून शहरातील खासगी रुग्णालये नागरिकांकडून पैसे घेऊन लस देत आहेत. त्यासाठीचे दरही ठरवून देण्यात आले आहेत. मोफत लसीसाठी लागणाऱ्या रांगा व वारंवार निर्माण होणारा तुटवडा यामुळे अनेक नागरिक पैसे मोजून लस घेत आहेत.

शहरातील ३८ रुग्णालयांना परवानगी

महापालिकेने शहरातील ३८ रुग्णालयांना विकत लस देण्यासाठी परवानगी दिली आहे. यातील २४ रुग्णालये महात्मा फुले आरोग्य योजना लागू असलेली आहेत तर उर्वरित या योजनेबाहेरची आहेत. सध्या शहरातील नऊ रुग्णालयांनीच ८९ हजार ९७० लसी खरेदी केल्या आहेत. आतापर्यंत ५१ हजार जणांनी विकत लस घेतली आहे. एकटय़ा बजाज रुग्णालयाकडे २५ हजारांच्या १० लशी शिल्लक आहेत. २०० रुपयांना लस मात्रा या ठिकाणी दिली जात असल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

असे आहेत दर

शासनाने खासगी रुग्णालयांना कोविशिल्ड ६३०, कोवॅक्सिन १ हजार २६० व स्पुटनिक ९४८ रुपयांना उपलब्ध करून दिली आहे. यावर सेवा शुल्क म्हणून खासगी रुग्णालये १५० रुपये आकारू शकतात.