सुहास सरदेशमुख

करोना रुग्णांचे राज्यातील प्रमाण वाढत असल्याने प्राणवायू वापराचे प्रमाण काही शहरांमध्ये चार पटींनी वाढले आहे. अतिदक्षता विभागात दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णास ऑक्सिजनची गरज लागत असल्याने ६० खाटांच्या रुग्णालयात द्रवरूप ऑक्सिजनसाठी चार ते साडेलाख रुपयांचा खर्च आता नऊ ते दहा लाख रुपयांपर्यंत वाढला आहे.

द्रवरूप ऑक्सिजन साठविण्यासाठी मोठय़ा रुग्णालयांमध्ये दहा हजार लिटरच्या टाक्या तयार केल्या जातात. शहरातील मोठय़ा रुग्णांलयामध्ये ही सोय आहे. मात्र तालुक्याच्या ठिकाणी सिलेंडरच्या साहाय्याने पुरवठा होतो. एका सिलेंडरमध्ये साधारणत: सात घनमीटर प्राणवायू असतो. द्रवरूप ऑक्सिजनचा दर आणि शुद्धता लक्षात घेता जिल्हा रुग्णालयात ही व्यवस्था कार्यान्वित करावी लागणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांचे म्हणणे आहे. औरंगाबादसारख्या शहरात जेथे रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढते आहे तेथे ऑक्सिजनची कमतरता राहणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. प्राणवायू पुरवठादारांशी चर्चा झाली असून मराठवाडय़ात ऑक्सिजन पुरवठय़ाची अडचण येणार नाही, एवढा साठा असल्याचा दावा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केला.

शहरांत साठा पुरेसा..

मुंबई, पुणे, औरंगाबाद, सोलापूर या शहरांमध्ये ऑक्सिजनचा पुरेसा साठा आहे. औरंगाबाद विभागात १०१० ऑक्सिजनच्या टाक्या आणि ४८ मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजन उपलब्ध असल्याची माहिती अन्न व औषधे विभागाचे सहसंचालक संजय काळे यांनी दिली.

परिस्थिती काय?

करोनाची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांना जेवढी औषधाची गरज असते तेवढीच ऑक्सिजनची गरज लागते. साधारण लक्षणे आढळल्यानंतर प्रतिमिनिट प्रवाह कमी ठेवला जातो. ज्यांच्या शरीरातील ऑक्सिजन प्रमाण कमी होते त्यांना अधिक दाबाने तो पुरविला जातो. गेल्या महिन्यापासून राज्यभरात वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे प्राणवायूचा वापर चार पटींनी वाढला आहे.

काय हवे?

द्रवरुप ऑक्सिजनचे दर २२ रुपये असून टाकीतून वायूरूपातील ऑक्सिजनचा दर बाजारपेठेत १७.२५ रुपये प्रतिघनमीटर एवढा आहे. मात्र, द्रवरुप ऑक्सिजनची शुद्धता ९९.५ टक्के एवढी आहे.  त्यामुळे येत्या काळात सर्वच रुग्णालयातील जुन्या व्यवस्थांना बदलावे लागेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे मत आहे.

ऑक्सिजन सिलिंडरच्या वाहतुकीमुळे त्याची विविध शहरातील किंमत कमी जास्त असू शकते. ऑक्सिजनची निर्मिती करणारे प्रकल्प पुणे व मुंबई भागातील आहेत. रिकाम्या सिलिंडरची किंमत साधारणत: सात हजार रुपये एवढी असते. त्यातील गॅसची किंमत मात्र २८० रुपयांपर्यंत असू शकते. दररोज ऑक्सिजनचा साठा आणि उत्पादन दोन्हीवर  सरकारचे लक्ष आहे.

– संजय काळे, सहसंचालक अन्न व औषध प्रशासन