डास नसणारे गाव असू शकेल? गावोगावी तुंबलेल्या गटारी, रस्त्यांवरून वाहून जाणारे सांडपाणी त्यामुळे डास घालवता येणे अशक्यच असे कोणीही म्हणेल. मात्र, नांदेड जिल्ह्यातील टेंभुर्णी हे गाव पूर्णत: डासमुक्त आहे. शोषखड्डा हे त्याचे गमक. शोषखड्डयाच्या प्रचलित पद्धतीत सिमेंटची टाकी बसवून करण्यात आलेल्या नवोपक्रमामुळे डासमुक्तीचे अभियान नांदेड जिल्ह्यात सुरू करण्यात आले. याचीच फलश्रुती म्हणून ४० गावांची वाटचाल डासमुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे. जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी या प्रयोगाला जिल्हाभर नेण्याचा आग्रह धरल्याने ग्रामीण भागात स्वच्छतेच्या अंगाने नवे बदल होत आहेत.
स्वच्छता अभियान व पर्यावरणपूरक ग्रामसमृद्धी योजनेत सातत्यपूर्ण भाग घेणाऱ्या टेंभुर्णीत शोषखड्डे होतेच. दोन-तीन वर्षांत ते भरत.  रस्त्यावर पाणी येई. त्यावर उपाययोजना करण्यासाठी टेंभुर्णीतील अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या प्रल्हाद पाटील यांनी शोषखड्डय़ात ३ बाय ३ आकाराची टाकी बसविली. त्याच्या वरून पाणी जाण्यासाठी चारी बाजूंनी वेज पाडले. परिणामी सांडपाणी टाकीत पडले की गाळ खाली राहतो आणि पाणी शोषखड्डय़ात मुरते. साधारण तीन-पाच वर्षांत भरलेली टाकी रिकामी केली की, शोषखड्डय़ातील पाणी बाहेर पडत नाही. गावात रस्त्यांवरून पाणी वाहत नसल्याने डासांना अंडी घालण्यासाठी जागाच नसते. नांदेड जिल्ह्यातील शंभर गावांत हा प्रयोग करण्यात आला आहे. त्यातील ४० गावांची वाटचाल डासमुक्तींच्या दिशेने सुरू झाली आहे.
गावात १०० मीटरची गटार बांधण्यासाठी २ लाख रुपये लागतात. बांधकाम खात्याचा हा हिशेब गृहीत धरता शोषखड्डय़ांमुळे मोठी बचत होत आहे. आता राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून शोषखड्डय़ांसाठी प्रत्येकी २ हजार रुपयांची तरतूद उपलब्ध करून देण्यात आली आहे. टाकी-पाईपसाठी ६०० रुपये व अन्य रक्कम अकुशल कामासाठी वापरली जाते. हे काम उभे राहावे, या साठी प्रयत्न करणारे अभिमन्यू् काळे म्हणाले की, आता काही गावांत यश मिळते आहे. गाव डासमुक्त होऊ शकते, असा विश्वास निर्माण करण्यात यश आले आहे. सांडपाणी शोषखड्डय़ात सोडल्याने गावातील पाणी गावात मुरविले जाते. त्याचा पाणीपातळीत वाढ होण्यावरही परिणाम होत आहे.
या सगळ्या प्रयोगाची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक प्रवीणसिंह परदेशी यांनी या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी निरीच्या शास्त्रज्ञांना काम पाहण्यास पाठवले. मुरलेले सांडपाणी पिण्यास योग्य आहे का, हे तपासण्यासाठी त्यांनी या गावातील पाणी नमुनेही घेतले. त्याचा अहवाल येणे बाकी आहे.
गावोगावी सुरू असणारी शोषखड्डय़ांच्या या मोहिमेची माहिती घेण्यासाठी आता आंध्र प्रदेश, ओडिसा, कर्नाटक राज्यांतूनही पाहणी पथके येत आहेत. डासमुक्त गावांचा संकल्प केवळ शोषखड्डय़ांच्या आधारे पूर्ण झाल्यास आरोग्याचे अनेक प्रश्न निकाली निघतील, असा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे प्रशासकीय पातळीवर या योजनेचे नियंत्रण आरोग्य विभागाने करावे, असे आदेश काळे यांनी दिले आहेत. परिणामी गावोगावी वाहत्या गटारी कोरडय़ा होऊ लागल्या आहेत.
‘‘२०० उंबरठा आहे गावात. शोषखड्डय़ांमुळे रस्त्यांवरून पाणी वाहत नाही. त्यामुळे डास, चिलटे नाहीतच. काँग्रेस गवत होते. आता तेही काढले. झाडे लावली आहेत. त्यामुळे गावात डास नाहीत. आता गावात कधी हिवताप व डेंग्यूसारखे आजार आले नाहीत.’’
– प्रल्हाद पाटील, सरपंच, टेंभुर्णी, हिमायतनगर
‘‘गटारींची कामे करण्यावर सर्वच गावकऱ्यांचा जोर असतो. नव्या प्रकरचा शोषखड्डा केल्यास गटारी करण्याचीच गरज पडणार नाही. तो पसा वाचेल. पुनर्भरण तर होईलच; शिवाय डासमुक्तीमुळे आरोग्याचे प्रश्न बऱ्याच प्रमाणात निकाली निघतील. हा प्रयोग आता शंभर गावांत सुरू आहे. ४० गावांमध्ये डासांची घनता कमी झाली आहे.’’
– अभिमन्यू काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. नांदेड