सन्यदलात भरतीसाठी बनावट कागदपत्रे देऊन फसवणूक केल्याप्रकरणी ८ ते ९ जिल्ह्य़ांमधील ४३जणांविरोधात शहरातील छावणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सैन्यात भरती होताना बनावट कागदपत्रे दिल्याच्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
औरंगाबाद, धुळे, जळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा आदी जिल्ह्य़ांतील हे उमेदवार आहेत. मागील वर्षी २१ जुलै ते ६ ऑगस्ट दरम्यान शहरातील गारखेडय़ात विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर सैन्यदलात भरतीची जम्बो मोहीम राबविण्यात आली होती. यात सहभागी झालेल्या तरुणांनी नोकरीच्या आमिषाने सादर केलेली सर्व कागदपत्रे बनावट असतानाही ती खरी असल्याचे भासवून सैन्यात भरती झाले. मात्र, काही दिवसांनी सैन्यभरती कार्यालयातील कर्नल मोहनलाल सिंह यांना या उमेदवारांच्या कागदपत्रांबाबत संशय आला. त्यामुळे त्यांनी या कागदपत्रांविषयी उलटतपासणी केली असता सादर करण्यात आलेली सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे निदर्शनास आले. नोकरीच्या आमिषापोटी या तरुणांनी सरकारची फसवणूक केल्याचे लक्षात येताच सिंह यांनी तडक पोलीस ठाणे गाठून या उमेदवारांविरोधात तक्रार दिली. त्यावरून गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली. आता ही बनावट कागदपत्रे देणाऱ्या सर्वच ४३ उमेदवारांकडे या बाबत कसून चौकशी केली जाणार आहे. यात दोषी आढळणाऱ्या सर्वाना अटक करण्यात येणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे यातील बहुतांश तरुणांनी रहिवासी प्रमाणपत्र दलालांच्या माध्यमातून मिळवले होते. त्यामुळे पोलीस तपासाचा रोख दलालांवरही राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सैन्यदलात भरतीसाठी उमेदवारांना सर्व कसोटय़ांतून जावे लागत असले, तरी बनावट कागदपत्रे देऊन लष्कराच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार उघडकीस आल्याने सर्वच संबंधितांचे धाबे दणाणले आहे.