परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या येहळेगाव सोळंके शाखेत ४४ लाख ७७ हजार ७०३ रुपयांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे. काही कर्मचाऱ्यांनी या रकमेचा भरणा केला, तर काहींनी अजून त्याकडे दुर्लक्ष केल्याने बँकेचे विभागीय अधिकारी शंकरराव बुद्रुक यांनी दिलेल्या तक्रारीवरून औंढा नागनाथ येथे गुन्हा दाखल नोंदविण्यात आला.
जिल्हा बँकेच्या औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगाव सोळंके येथे असलेल्या या शाखेत १ जुल २००३ ते २७ एप्रिल २०१३ दरम्यान रोखपाल व तपासणीस पदावर काम करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांनी संगनमत करून बनावट हस्ताक्षराआधारे रकमेचा अपहार केला. हे प्रकरण जिल्हाभर गाजत असताना अपहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांपकी चौघांनी अपहाराची रक्कम भरली. मात्र, सेवानिवृत्त झालेले काही कर्मचारी त्याकडे दुर्लक्ष केल्याने हे प्रकरण अधिकच चच्रेत आले.
बँकेतील अपहार प्रकरण सर्वत्र गाजत होते. येहळेगाव सोळंके येथे १ जुलै २००३ ते २७ एप्रिल २०१३ दरम्यान रोखपाल व तपासनीस म्हणून नेमणूक असताना दिलीप भालेराव याने या कालावधीत २८ लाख २४ हजार ८३३ रुपये, तर श्रीरंग कठाळे यांनी ३ लाख ६२ हजार २५० रुपये या प्रमाणात दोघांनी ३१ लाख ८७ हजार ८३ रुपये खात्यातून व ठेवींच्या रकमेतून परस्पर बनावट सहय़ा करून, बनावट चलन तयार करून उचलून रकमेचा अपहार केल्याचे तपासणीअंती उघडकीस आले.
बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून अपहारप्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात आरोपी दिलीप भालेराव व श्रीरंग कठाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. बँकेचे विभागीय अधिकारी नामदेव शंकरराव बुद्रुक यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून दिलीप सूर्यभान भालेराव, सेवानिवृत्त कर्मचारी व तत्कालीन शाखा तपासनीस श्रीरंग रानबा कठाळे (चोंढी शहापूर) यांनी संगनमत करून विथड्रॉवलद्वारे गरव्यवहार केल्याची बाब औरंगाबाद येथील लेखापरीक्षक येथील एस. एम. बांगड यांनी दिलेल्या वार्षिक तपासणी अहवालमध्ये अहपराची नोंद केली.
या अनुषंगाने जिल्हा बँक व्यवस्थापनाने संबंधित तत्कालीन रोखपाल व शाखा तपासनीस यांना अपहाराची रक्कम बँकेत भरणा करण्यासंदर्भात वेळोवेळी लेखी स्वरूपात नोटिसा दिल्या होत्या. परंतु या दोघांनी नोटिशीचे कुठल्याही प्रकारे उत्तर दिले नाही. तसेच अपहाराच्या रकमेचा बँकेत भरणा केला नाही, असे औंढा पोलिसात दिलेल्या फिर्यादीत नमूद केल्याने औंढा पोलिसांनी त्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. एकूण ४५ लाखांचा अपहार झाला होता. मात्र, ४ कर्मचाऱ्यांनी अपहाराची रक्कम भरल्याने अखेर तो आकडा ३१ लाख ८१ हजारांवर आला आहे.