जिल्ह्यच्या इतिहासात पहिल्यांदाच पीकविम्यापोटी तब्बल साडेचारशे कोटींची रक्कम मंजूर करण्यात आली. यापूर्वी २०१४मध्ये खरीप हंगामातील पीक नुकसानीपोटी १५५ कोटींचा विमा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला होता. या तुलनेत यंदा पीकविम्यापोटी तिप्पट रक्कम मंजूर झाली. राज्याच्या एकूण रकमेच्या तुलनेत ही रक्कम १० टक्के आहे.
दिल्ली येथील एआयसी कंपनी व राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एवढी मोठी रक्कम मिळणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. मागील ४ वर्षांपासून गारपीट, अवकाळी पाऊस, कधी अल्प तर कधी अतिवृष्टी यामुळे नसíगक संकटाच्या खाईत सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने तात्पुरता दिलासा दिला आहे.
राष्ट्रीय कृषी पीकविमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी २१ कोटींचा हप्ता भरला होता. त्यापोटी मागील वर्षी खरीप हंगामात झालेल्या नुकसानीचा मोबदला म्हणून जिल्ह्यास पीकविम्याची ४५५ कोटी ४४ लाख रुपयांची रक्कम मंजूर झाली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी ही रक्कम मिळावी, या साठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मोठा पाठपुरावा केला. नसíगक आपत्तीच्या वेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा भरण्याबाबत आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत ३ लाख ९६ हजार हेक्टर क्षेत्रावर राष्ट्रीय पीकविमा योजनेंतर्गत पीकविम्याच्या अनुदानासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी २१ कोटी ७१ लाख रुपयांच्या पीकविम्याचा हप्ता भरला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पीकविम्यापोटी २० मेपर्यंत साडेचारशे कोटींचे अनुदान वितरित न केल्यास शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार पाटील यांनी दिला होता. या बरोबरच ५०पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांतील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केली होती. आमदार पाटील यांच्या पाठपुराव्यास अखेर यश आले. ऐन दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला खरीप पेरणीसाठी या रकमेचा मोठा आधार मिळणार आहे.
पीकविमा वाटपाची प्रक्रिया क्लिष्ट असली, तरी शेतकऱ्यांच्या हातात रक्कम लवकर पडावी, या साठी जिल्हा सहकारी बँकेचे कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करतील, असे जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी सांगितले. जिल्ह्यास मिळालेल्या ४५५ कोटी ४४ लाख रुपयांच्या पीकविमा रकमेपकी सर्वाधिक रक्कम उस्मानाबाद तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहे. उस्मानाबाद तालुक्यास १०६ कोटी ९१ लाख, तुळजापूर ९३ कोटी ९९ लाख, कळंब ६७ कोटी ६३ लाख, उमरगा ५३ कोटी ३७ लाख, वाशी ३१ कोटी ९ लाख, परंडा ४३ कोटी ३१ लाख, लोहारा ३७ कोटी ५५ लाख आणि भूम तालुक्यासाठी २१ कोटी ५९ लाख रुपयांचा पीकविमा मंजूर झाला.