औरंगाबाद शहरात सध्या सर्दी-खोकल्याची साथ पसरली आहे. त्याचे स्वरूप एवढे विस्तारले आहे, की थेट कारागृहातील ५० हून अधिक कैद्यांना अन्य कैद्यांपासून वेगळे ठेवावे लागण्याची वेळ कारागृह प्रशासनावर आली आहे. सध्या कारागृहात १ हजार ४०० हून अधिक कैदी आहेत. अन्यांना लागण होऊ नये म्हणून त्यांना १४, १५ आणि १६ या क्रमांकाच्या स्वतंत्र सेलमध्ये हलविण्यात आले असल्याचे कारागृह निरीक्षक विनोद शेकदार यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून तापमान बदलल्यामुळे सर्दी-पडशाच्या रुग्णांमध्ये झपाटय़ाने वाढ झाली आहे. स्वाइन फ्लूचेही रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. अलिकडेच दोघांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. मात्र, ती साथ अधिक तीव्र नाही. तुलनेने जंतुसंसर्ग अधिक आहे. घशात खवखवणे व कफ वाढल्याने तापेच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. कारागृहातही त्याची मोठय़ा प्रमाणात लागण झाली. कारागृहातील वैद्यकीय अधिकाऱ्याला नुकतीच लाच घेताना अटक करण्यात आली. सध्या एक वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असल्याचे निरीक्षक शेकदार यांनी सांगितले.