औरंंगाबादमध्ये साधारण महिन्याभरानंतर पावसाचे आगमन झाल्याने काही ठिकाणच्या पिकांचा जीवनदान मिळाले. मात्र, जिल्ह्यातील बहुतांश भागातील पीके वाया गेल्याची स्थिती आहे. खरीप हंगामात अपेक्षित पर्जन्यमान झाले नसल्याने यावर्षी सरासरी ५० टक्यापर्यंत पिकांच्या उत्पादन क्षमतेत घट होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला असून त्यासंबंधीचा अहवाल त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात सादर केला आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री, वैजापूर आणि खुलताबाद तालुक्यातील पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.
जूनच्या प्रारंभी पडलेल्या पावसाच्या भरवशावर जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी उरकल्या होत्या. यानंतर अधुनमधून काही दिवस पाऊस पडला मात्र, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यानंतर पावसाने साधारण महिनाभर दांडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली होती. काही भागातील पीके पाण्याअभावी वाया गेली. जिल्ह्यात १५ आणि १६ जूनला पडलेल्या पावसामुळे पिकांचा जीवनदान मिळाले असले तरी अपेक्षित वाढ झाली नसल्याने उत्पादन क्षमता सरासरी ५० टक्के कमी होणार असल्याचा अंदात कृषी विभागाने व्यक्त केला आहे. यात वैजापूर तालुक्यातील १३७ गावासह ४० हजार हेक्टरवरील पीके बाधित झाली असून कापूस, मका आदी पिकात ५० टक्के घट होणार आहे. तसेच फुलंब्री, पैठण, कन्नड, खुलताबाद, सोयगाव, सिल्लोड तालुक्यात सुद्धा अपेक्षित पर्जन्यमान झाले नाही. त्यामुळे सरासरी ५० टक्यापर्यंत उत्पादन क्षमता कमी झाली आहे.
गंगापूर तालुक्यातील कापूस, मका ५० टक्के मूग पिकांचे उत्पादन ८० टक्यापर्यंत घटणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. जिल्ह्यातील काही भागात खोड किडीचा प्रादुर्भाव आढळून येत असून पोंगेमर रोगामुळे सुद्धा पिकांचा नुकसान होत आहे. विविध रोग आणि अपेक्षित पर्जन्यमान झाले नसल्याने जिल्ह्यातील सरासरी पीक उत्पादनात ५० टक्के घटणार असल्याने शेतकरी पुन्हा मोठ्या संकटात सापडणार आहे.