चिकुनगुन्यावर मात करण्यासाठी महापालिकेला उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर फवारणीचा दररोज अहवाल द्यावा. तसेच फवारणी औषधाचाही दर्जा तपासून घेण्याचे आदेश आदेश महापालिका आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मंगळवारी दिले. दरम्यान, महापालिकेने आणखी ५० पंप खरेदी केले असून ते पंप आजच ताब्यात घेण्यात आल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. अरिवद जगताप यांनी सांगितले.
शहरात गेल्या काही दिवसांपासून चिकुनगुन्याची साथ पसरली असून उच्च न्यायालयातील एका न्यायमूर्तीनाही त्याची लागण झाली. या पाश्र्वभूमीवर महापालिकेने शपथपत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. आयुक्त केंद्रेकर यांनीही शहराच्या न्यायनगर भागात पाहणी केल्यानंतर डास आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाने पंप खरेदी करण्याचे ठरविले. मंगळवारी ५० पंप खरेदी करण्यात आले. खरेदीचे पंप ताब्यात आले की नाही, याचा पाठपुरावा करीत आयुक्त केंद्रेकर यांनी कंत्राटदाराकडून फवारणीस पुरविण्यात येणाऱ्या औषधांचा दर्जा योग्य आहे की नाही, याची खात्री करून घेण्याचे आदेश दिले आहेत.
महापालिकेच्या मालकीचे २४ पंप, ठेकेदारांचे २० पंप तसेच धूर फवारणीच्या २० मशीन, २ जीप व ट्रॅक्टरवरील ३ यंत्रसामग्री उपलब्ध आहेत. मंगळवारी ५० पंप ताब्यात आल्याने चिकुनगुन्याची साथ आटोक्यात आणण्यास काही अंशी सुरुवात होईल, असे मानले जात आहे. अस्तिवात असणाऱ्या औषधांचा साठाही तपासला जाणार असल्याचे डॉ. जगताप यांनी सांगितले.