जालना व परभणी जिल्ह्य़ांच्या सीमेवरील निम्न दूधना जलसिंचन प्रकल्पात १३३.४५ दलघमी म्हणजे ५५.०९ टक्के उपयुक्त जलसाठा झाला आहे. प्रकल्पातील पाणीपातळी ४२४ मीटर असून मृतसाठय़ासह सध्याचा संपूर्ण साठा २३६ दलघमी आहे.
निम्न दूधना प्रकल्पातील मृतसाठा १०२ दलघमी असून प्रकल्प संपूर्ण भरेल, तेव्हा साठवण क्षमता ३४४ दलघमी व उपयुक्त जलसाठा २४२ दलघमी असू शकतो. या मोठय़ा प्रकल्पाव्यतिरिक्त जालना जिल्ह्य़ातील ७ मध्यम प्रकल्पांमध्ये ३५.३१ दलघमी उपयुक्त जलसाठा असून त्याचे प्रमाण ५२.४८ टक्के आहे. या सातही मध्यम प्रकल्पांतील मृत जलसाठा १०.५८ दलघमी आहे. भोकरदन व जालना तालुक्यांत प्रत्येकी दोन, तर अंबड, बदनापूर व जाफराबाद तालुक्यांत प्रत्येकी एक मध्यम प्रकल्प आहे. अनेक वर्षांनंतर बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथील प्रकल्प १०० टक्के भरला आहे. या प्रकल्पातील संपूर्ण जलसाठा १२.३७ दलघमी, पैकी उपयुक्त साठा १२.१ दलघमी आहे. अंबड तालुक्यातील गल्हाटी मध्यम प्रकल्पात ८.७१ दलघमी म्हणजे ६४ टक्के उपयुक्त जलसाठा झाला आहे. जाफराबाद तालुक्यातील जीवरेखा प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा २५ टक्के आहे.
जिल्ह्य़ातील सातपैकी सर्वात कमी क्षमतेच्या जुई मध्यम प्रकल्पात ३.५१ दलघमी म्हणजे ५८ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. धामणा मध्यम प्रकल्पात २.६२ दलघमी म्हणजे ३१ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. या प्रकल्पातील मृत जलसाठा २.२१ दलघमी आहे. जालना तालुक्याच्या कल्याण गिरजा प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा ८१ टक्के, तर कल्याण मध्यम प्रकल्पातील पाण्याची पातळी जोत्याच्या खाली आहे.