चार वर्षांचा दुष्काळ आणि आता अतिवृष्टी यामुळे शेतकरी आत्महत्यांचा आकडा ऑक्टोबरअखेर ५९ होता. मराठवाडय़ात सरासरी दररोज दोन आत्महत्या नोंदविल्या जातात. मे, जून आणि जुलै या तीन महिन्यांत पाऊस नव्हता त्यामुळे आत्महत्यांचा आकडा काहीसा वाढला होता. पाऊस पडल्यामुळे आशा वाढली आहे. नुकसान झाले असले तरी पाणी असल्यामुळे रब्बी हंगामात अधिक चांगले पीक घेता येईल किंवा भाजीपालासह आणखी एक नगदी पीक घेता येईल, असे शेतकरी ठरवत आहे. मात्र, त्यासाठी विजेची उपलब्धता हा प्रश्न उपस्थित होत आहे. येत्या काळात पाणी उपसा करण्यासाठी विनाअडथळा वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

जानेवारी ते मार्च या कालावधीत ६०पेक्षा अधिक शेतकरी आत्महत्यांची नोंद होती. एप्रिलमध्ये ७१ आत्महत्या झाल्या होत्या. मे, जून आणि जुलै या तीन महिन्यांत हा आकडा वाढत गेला. जुलैमध्ये सर्वाधिक ८५ आत्महत्यांची नोंद प्रशासनाकडे होती. ऑक्टोबरमध्ये हा आकडा काहीसा कमी झाल्याचे दिसून येत आहे. पावसाचा आणि शेतकरी आत्महत्यांच्या आकडय़ांचा संबंध जोडला जात असून पाणी उपलब्ध झाले असल्यामुळे नुकसान झाले असले, तरी रब्बी हंगाम घेता येईल, अशी आशा सर्वत्र आहे. मात्र, जमिनीतील पाणी कमी झाल्यानंतर रब्बी ज्वारीच्या क्षेत्रात वाढ होईल असे कृषी अधिकारी सांगत आहे. या वर्षांत ७२५ आत्महत्या आतापर्यंत नोंदविण्यात आल्या असून त्यातील ५२५ आत्महत्या शेतीच्या नापिकीमुळे आणि कर्जबाजारीपणामुळे झाल्या असल्याचे प्रशासकीय पडताळणीतही समोर आले आहे. मात्र, रब्बी हंगामात अधिक पीक यावे यासाठी विजेची उपलब्धता हा कळीचा मुद्दा असेल, असे शेतकरी सांगत आहेत. अलिकडेच पीक नुकसानीच्या पाहणीसाठी आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर वीज उपलब्ध करून द्यावी व वीज देयके माफ करावीत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. दुष्काळामुळे वीज फारशी वापरली गेली नाही आणि अतिपावसामुळे पाणी उपसा करण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे वीजदेयके माफ करावी, अशी मागणी होत आहे.

महिनानिहाय शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी

जानेवारी-६२, फेब्रुवारी-६७, मार्च-  ६९, एप्रिल-७१, मे-८३, जून-८२, जुलै-८५, ऑगस्ट-७६, सप्टेंबर-६१, ऑक्टोबर-५९.