19 October 2019

News Flash

धर्मादाय संस्थांकडून ६० कोटींचा कर वसूल

आयकर विभागाला मागील वर्षांत यश आले असून त्यातून तब्बल ६० कोटी रुपयांचा कर वसूल केला आहे

(संग्रहित छायाचित्र)

औरंगाबाद : सामाजिक क्षेत्रातील जी कामे सरकार करू शकत नाही किंवा यासाठी सरकारची संसाधने अपुरी पडतात, अशी कामे धर्मादाय संस्थांनी करणे अपेक्षित आहे. परंतु आतापर्यंतचा अनुभव पाहता यात धर्मादाय संस्था मोठय़ा प्रमाणावर अपयशी ठरले असून त्यामुळे यापुढील काळात धर्मादाय संस्थांवर आयकराची अत्यंत करडी नजर असणार आहे, असे प्रतिपादन दिल्ली येथील प्रधान मुख्य आयकर आयुक्त प्रमोद कुमार गुप्ता यांनी येथे केले. तर औरंगाबाद विभागाने धर्मादाय संस्थांवर केलेल्या कारवायांमधून सुमारे १७० कोटी रुपयांचे करपात्र उत्पन्न शोधण्यात आयकर विभागाला मागील वर्षांत यश आले असून त्यातून तब्बल ६० कोटी रुपयांचा कर वसूल केला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

केवळ महाराष्ट्रमध्ये आठ लाख नोंदणीकृत धर्मादाय संस्था असूनदेखील केवळ काही हजार संस्था आयकर विवरणपत्र भरतात ही चिंतेची बाब असून यासाठी आता अत्यंत कडक पावले उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले. आयकर विभाग औरंगाबाद व सीए असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

औरंगाबादचे धर्मादाय आयुक्त श्रीकांत भोसले याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की,  धर्मादाय संस्था विशेषत: इस्पितळे यांनी गोरगरिबांसाठी खरोखर कार्य करावे यासाठी कायद्याची सक्त अंमलबजावणी त्यांचे संचालनालय करीत आहे. अनेकदा आठवण देऊनही विवरणपत्र न भरणाऱ्या हजारो संस्थांची नोंदणी आपण रद्द केली असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

औरंगाबादमध्ये नोंदणी शिबिर स्थळ

धर्मादाय संस्थांच्या प्रतिनिधींना वारंवार संबंधित कामासाठी पुण्याच्या फेऱ्या कराव्या लागतात. ही अडचण समोर मांडण्यात आल्यानंतर वेगवेगळ्या जिल्ह्यंच्या ठिकाणी खास शिबिर घेणार असल्याचे या जनसंवाद कार्यक्रमात प्रमोदकुमार गुप्ता यांनी जाहीर केले.

First Published on May 8, 2019 2:39 am

Web Title: 60 crores tax collected from charitable organizations