दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनाने मागेल त्या गावाला पिण्यासाठी टँकर आणि गुरांची छावणी देण्यास सुरुवात केल्याने १६ मार्चपर्यंत टँकरची संख्या ६२० झाली असून छावण्यांनीही अडीचशेचा आकडा पार केला आहे. तब्बल २ लाखांपेक्षा जास्त पशुधन छावणीत आश्रयाला आल्याची सरकार दफ्तरी नोंद झाली असल्याने छावणी दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांसह जनावरांनाही आधार बनली आहे. दुसरीकडे छावणीत नियमांची पायमल्ली होत असल्याचे तपासणीत लक्षात आल्यानंतर प्रशासनाने दीडशे छावणी चालकांना ३७ लाख रुपयांचा दंड आकारला आहे. राज्यात सर्वाधिक टँकरबरोबर छावणीचाही जिल्हा अशी ओळख झाली आहे.
जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळी स्थिती निर्माण झाल्यामुळे ऑगस्ट महिन्यातच सरकारने चाराटंचाईवर पर्याय म्हणून गुरांच्या छावण्या सुरू करण्यास परवानगी दिली. राजकीय कार्यकर्त्यांचा हा अनुदानित छावणीचा उद्योग प्रशासनाच्या सहकार्याने चांगलाच बहरला. महिनाभरातच छावण्यांनी शंभरी ओलांडल्यानंतर काही दिवसांपूर्वी रब्बीत दोन महिना पुरेल इतका चारा उपलब्ध झाल्याचा दावा करीत छावण्या बंद करण्याचा निर्णय झाला. त्यावर सर्वच पक्षांकडून टीका झाल्यानंतर छावण्या सुरू ठेवल्या. जिल्हा प्रशासनाने आता मागेल त्यास छावणी देण्यास सुरुवात केल्याने १६ मार्चपर्यंत छावण्यांची संख्या २५३ वर पोहोचली आहे. या छावण्यांमध्ये तब्बल २ लाख ३ हजारांपेक्षा जास्त जनावरे आश्रयास आहेत. आणखी जवळपास ५० पेक्षा जास्त छावण्या मंजूर होण्याची शक्यता असून ज्या भागात गरज आहे, त्या भागात अर्ज येताच प्रशासन तत्काळ छावणी मंजूर करीत आहे. त्यामुळे छावण्यांची संख्या ४००पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गावातून प्रस्ताव येताच मंजूर करून टँकर पाठवण्यास सुरुवात होत असल्याने आतापर्यंत टँकरची संख्या राज्यात सर्वाधिक ६२० नोंदवली गेली आहे. जूनपर्यंत टँकरची संख्या एक हजारावर जाईल, असा प्रशासकीय यंत्रणेचा अंदाज आहे. १ हजार १९ ग्रामपंचायतींसाठी जवळपास हजार टँकर व ४०० छावण्या सुरू होतील, असा प्रशासकीय सूत्रांचा अंदाज आहे. त्यामुळे दुष्काळात सरकारकडून दिल्या जाणाऱ्या टँकर आणि छावणीच्या आधारातून अनेकांचा मात्र मोठय़ा प्रमाणात फायदा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.