01 June 2020

News Flash

मराठवाडय़ातील ६३ टक्के शेती अतिवृष्टीने उद्ध्वस्त

दुष्काळानंतर मोठे संकट

(संग्रहित छायाचित्र)

सुहास सरदेशमुख

राज्याला अवेळी पावसाने मोठा झटका दिला. राज्यातील ३२५ तालुक्यांमधील शेतीचे नुकसान झाले. राज्य सरकारने अवेळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी १० हजार कोटींची तरतूद केली आहे. राज्यावरील संकट मोठे आहे. शेती आणि पिकांचे किती नुकसान झाले याचा विभागनिहाय आढावा.

सलग तीन वर्षांपासून दुष्काळात पिचलेल्या मराठवाडय़ाला यावेळी अतिवृष्टीने मारले. ऐन पीक कापणी आणि खळे करण्यापूर्वी परतीच्या लांबलेल्या पावसाने शेतकरी पुरते हैराण झाले आहेत. ४८ लाख ७० हजार हेक्टरांपैकी ३५ लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. मका आणि बाजरी पिकाला जागच्या जागी नवे मोड आले. सोयाबीनची तऱ्हाही तशीच झाली. कापसाच्या बोंडात पाणी शिरले. काही कापूस काळा पडला. त्यावर आता लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. बोंडअळीचे संकटही कायम आहे. ज्वारीचे नुकसानही मोठे आहे. परिणामी, दुष्काळात विचारला जाणारा जगायचे कसे, हा प्रश्न आता अतिपावसामुळे कायम आहे.

मराठवाडय़ातील आठ जिल्ह्य़ांमध्ये पीक येण्यापुरता पाऊस झाला होता. ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा नव्हता. मात्र, परतीच्या पावसाचा जोर एवढा वाढला की, शेतात पाणी घुसले. कापणी करून ठेवलेले पीक कुजले, सडले, त्याला मोड आले.  नुकसान एवढे वाढले होते की त्याचा अंदाज घेईपर्यंत शेतकऱ्यांचे आयुष्य पूर्णत: उद्ध्वस्त झाल्याचे दिसून आले. ज्वारी, बाजारी हे पीक तर हातचे गेले.

पीक पद्धतीत बदल

गेल्या दहा वर्षांत मराठवाडय़ातील पीक पद्धतीत मोठे बदल झाले. सोयाबीनचे क्षेत्र कमालीचे वाढले. ही वाढ साडेपाच ते सहा हजार पटीत वाढली. बहुतांश जिल्ह्य़ांमध्ये सोयाबीन हे प्रमुख पीक आहे. अवेळी पाऊस पडल्यामुळे सोयाबीनच्या शेंगा उघडय़ा व काळ्या पडल्या. आता त्यातून काहीएक उत्पन्न मिळण्याची शक्यता नाही. नांगरणी, पेरणी, कोळपणी, खताची मात्रा यावर झालेला पूर्ण खर्च आता वाया गेला आहे. त्यामुळे याही वेळी सरकारी मदतीची आस लावून बसल्याशिवाय मराठवाडय़ातील शेतकऱ्यांच्या हाती काहीएक राहिले नाही. मदत मिळण्याची प्रक्रिया एवढय़ा संथगतीची आहे की, अजूनही खरीप २०१८ मधील दुष्काळी अनुदानातील १०० कोटी रुपयांचे वाटप होणे बाकी होते. आचारसंहितेपूर्वीची ही स्थिती फारशी बदललेली नाही. १७७२ कोटी रुपयांचे अनुदान मराठवाडय़ातील शेतकऱ्यांसाठी आले होते. याशिवाय ३९० कोटी रुपयांचे अनुदानही स्वतंत्रपणे देण्यात आले होते. ही रक्कम काही शेतकऱ्यांना मिळाली. आता अतिवृष्टीच्या मदतीसाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा करण्यात आली आहे. अतिवृष्टी झाल्यास कोरडवाहू पिकांसाठी ६ हजार ८०० रुपये, बागायती पिकांसाठी १३ हजार ५०० रुपये आणि फळपिकांसाठी १८ हजार रुपये प्रतिहेक्टरी मदत देण्याची तरतूद शासन निर्णयात आहे. जेवढे नुकसान झाले आहे ते लक्षात घेता या मदतीच्या निकषात तातडीने बदल करण्याची आवश्यकता आहे. असे बदल करायचे असतील तर आधी सरकार स्थापन व्हावे लागेल.

शेतकऱ्यांचा संताप

मोठे नुकसान झाले असले तरी पीक विमा कंपन्यांनी पाहणीसाठी फारसा पुढाकार घेतला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच बीड जिल्ह्य़ात पीक विमा कंपनीच्या कार्यालयाला शेतकऱ्यांनी टाळे ठोकले. मराठवाडय़ातील सर्व तालुक्यांमध्ये  निषेध मोर्चाचे सत्र सुरू झाले आहे.

 

मराठवाडय़ातील ८८.३० लाख शेतकऱ्यांपैकी ३९.२९ लाख हेक्टर क्षेत्राचा विमा काढण्यात आलेला आहे. मात्र, अनेकांनी विमा न काढल्यामुळे त्यांना मदत देण्यासाठी राज्य सरकारला स्वतंत्र तरतूद करावी लागेल. त्यामुळे सरसकट सर्वाना मदत होईल असा निर्णय घेणे आवश्यक असणार आहे.

४० टक्के पंचनामे पूर्ण

६२.४२ टक्के क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित,

सिल्लोड, भोकरदन तालुक्यांमधील जमीन खरवडून गेल्या आहेत.

भोकरदन तालुक्यात ११०० मि.मी. एवढा पाऊस झाला आहे.

अनेक ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारेही वाहून गेले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2019 12:55 am

Web Title: 63 of marathwadas agriculture was destroyed by heavy rains abn 97
Next Stories
1 ‘मी परत येईन’ची लोकांना भीती
2 तुम्ही आमचे अन्नदाते आहात, खचून जाऊ नका : उद्धव ठाकरे
3 मराठवाडय़ातील टँकरचा फेरा यंदा थांबला
Just Now!
X