सरकता जिना, उद्वाहकामुळे काम उरले नसल्याची व्यथा

बदललेले तंत्रज्ञान कसे स्वीकारले जाते?- औरंगाबाद रेल्वेस्थानकावर नोंदणीकृत हमाल म्हणून काम करणारे रफीक शेख यांना विचारा. ते एका तंत्रज्ञानाचा आधार घेत दुसऱ्या तंत्रज्ञानामुळे ओढावलेल्या बेकारीची कथा सांगतात; तेही ट्विटरच्या माध्यमातून आणि कळवतात त्यांच्या व्यथा पंतप्रधान आणि रेल्वेमंत्र्यांना. रफिक यांनी आतापर्यंत ६५५ ट्विट्स केल्या. ते लिहितात-‘ रेल्वेस्थानकावर सरकता जिना झाला, उद्वाहक बसल्या आणि हमालाचे काम रेल्वेस्थानकावर फारसे तसे उरलेच नाही.’ असे देशभरात २१ हजारांहून अधिक हमाल. त्यांच्यापैकीच एक रफिक शेख. हमालीचे काम शिल्लक राहिले नसल्याने रेल्वेमध्ये कोठेतरी नोकरीमध्ये समावून घ्या, अशी त्यांची मागणी आहे. त्यांच्या मागणीला पंतप्रधान कार्यालयाने ‘लाइक’ केले आहे. अमित शहा, पीयूष गोयल यांनाही त्यांनी संदेश पाठविले आहेत. त्या ‘लाइक’ भरवशावर आता मागणी मान्य होईल, असे त्यांना वाटते.

औरंगाबाद शहराच्या रेल्वे स्थानकावरील हमाल तसे शिकलेले. म्हणजे बहुतेक जण पदवीधर. काहींनी १२ वीनंतर शिक्षण सोडले. रफिक शेख यांचे वडील रेल्वेमध्येच नोकरीला होते. त्यांनीच सुचवले, नुसते बसून राहण्यापेक्षा काम करून पैसे मिळव. रेल्वेमध्ये ‘कुली’ बिल्ला मिळविणेही तसे अवघडच काम. तेथेही अर्ज करावा लागतो. नोंदणी होऊन बिल्ला दंडाला आणि लाल रंगाचा गणवेश घातला की पूर्वी चार-पाचशे रुपये मिळत. अलीकडच्या काळात रेल्वे फलाटावर बऱ्याच सुधारणा झाल्या. सरकता जिना आला. उद्वाहक बसले. त्याच बरोबर सामानांच्या अगदी छोटय़ाशा बॅगांनाही चाके बसू लागली. तसे ओझे उचलण्याची कामे कमी झाले. प्रत्येक जण स्वत:चे सामान स्वत:च ओढू लागला. हमालाचे काम जवळपास संपले. मालवाहतूक धक्कय़ावरच बहुतांश काम. पण तेथील मजूर वेगळे. हमालीचे रेल्वेचे दर तसे ४० किलोपर्यंतच्या एका बॅगला ७० रुपये असे. त्यामुळे हाताला काम नसल्याने अनेक जण आता रेल्वेस्थानकावर फिरकत नाहीत. पण रफिक आणि त्यांचा मित्र संतोष भाले आवर्जून रेल्वे स्थानकावर येतात. तसे औरंगाबादमध्ये १५ ‘कुली’ आहेत. त्यातील परतूरमधला एक जण तर इंग्रजी विषयामधून पदवी घेतलेला. पुरेसे काम नसले तरी ते रेल्वे स्थानकावर येतात. कारण कधीतरी रेल्वेमध्ये वर्ग-४ च्या जागा निघाल्या तर नोकरी मिळेल, या आशेने. ही मागणी लावून धरण्यासाठी ट्विटरचे माध्यम वापरत रफिक शेखने सरकारमधील अनेकांना ५०० हून अधिक वेळा संदेश पाठविले आहेत. देशभरातून असे पाच हजारांहून अधिक संदेश रेल्वे मंत्र्यांकडे पाठविले जात आहेत. तंत्रज्ञानातील बदल आणि त्याच तंत्रज्ञानाच्या आधारे जगण्यासाठी नव्या मागण्या करत रफिक शेख यांना आशा आहे, कारण पंतप्रधानांनी त्यांच्या टिव्टसला लाइक केले आहे. ‘सबका साथ सबका विकास’ म्हणतात ते, बघू आता काय करतात, असे रफिक सांगतो.