डॉ. एपीजे अब्दुल कलाम खगोल व अंतराळ विज्ञान केंद्राचा अंदाज

औरंगाबाद : या वर्षी समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला असला तरी यंदा जेमतेम ६५ ते ७० टक्केच पाऊस पडेल, असे अनुमान येथील महात्मा गांधी मिशनच्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम खगोल व अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी वर्तवला आहे.

मुंबई, नाशिक, कोकण आदी भागात जोरदार पाऊस झालेला असला तरी राज्याच्या मराठवाडा आदी काही भागात अजूनही पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. परिणामी अजूनही ८५ टक्के शेतीच्या क्षेत्रावर पेरण्या झालेल्या नाहीत. मागील आठवडाभरापासून केवळ ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. ढग न बरसताच विरून जात आहेत.

या संदर्भात औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशनच्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले की, पावसाचे ढग उत्तरेकडे सरकले असल्यामुळे येत्या काही दिवसात पेरणीयोग्य पाऊस पडेल, असा अंदाज बांधला जातो आहे, ती शक्यता कमी आहे. पृथ्वीवरील किमान तापमानात घट होत असल्याने हिमयुगासारखी परिस्थिती निर्माण होत आहे. यामुळे विषुववृत्ताच्या भागात (इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्शन झोन- आयटीसीझेड) पावसाळ्यात मोठय़ा प्रमाणात निर्माण झालेले ढग आपल्याकडे, तसेच मध्य भारतात न बरसताच उत्तर भारताकडे सरकले आहेत. ढग उत्तरेकडे सरकल्याने आता पाऊस १३, १४, १५ जुलैदरम्यान, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशासारख्या भागातच थमान घालेल, असा अंदाज आहे. यंदाही जेमतेम ६५ ते ७० टक्केच पाऊस पडेल, असेच संकेत जागतिक तापमान परिमंडळातून मिळत असल्याचे औंधकर यांनी सांगितले.

प्रशांत महासागरात तापमान जेव्हा शून्यावरून ०.५ डिग्री सेल्सियसपर्यंत वाढले की अल-निनोची परिस्थिती होते, तर उणे ०.५ सेल्सियस तापमान झाले की ली-निनो परिस्थिती तयार होते आणि हे ली-निनोचे वातावरण पावसासाठी पोषक ठरते. दुर्दैवाने ली-निनोसारखी परिस्थिती सध्या नसून अजूनही अल-निनोचाच प्रभाव आहे. तो फेब्रुवारी २०२० पर्यंत राहणार आहे. या संदर्भात आपण १५ मार्च रोजी एक लेख लिहून जागतिक परिमंडळात होणाऱ्या बदलांवरून अंदाज व्यक्त केल्याचेही औंधकर यांनी सांगितले.