मराठवाडय़ात संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी नियोजन

औरंगाबाद : करोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना धोका असल्याचे सांगण्यात येत असल्याने मराठवाडय़ातील आठ जिल्ह्य़ांत सात हजारांहून खाटा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. १८ वर्षांखालील मुलांची संख्या, कोविडचा संसर्ग झालाच तर किती जणांना प्राणवायूची गरज लागेल, किती नवजात शिशूंना श्वसन यंत्र लागू शकतात याचा अंदाज घेऊन तयारी केली जात आहे. औरंगाबाद आणि नांदेड शहरातील लहान मुलांची संख्या जास्त आहे. गेल्या वर्षभरातील प्रसूतीची संख्या याचाही विचार नियोजन करताना केला असल्याचे सरकारी यंत्रणांकडून केला जात आहे. अलीकडेच या अनुषंगाने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी बैठक घेतली असून प्रत्येक जिल्ह्य़ात बालरोगतज्ज्ञांचा कार्यबल गटही स्थापित करण्यात आला आहे.

करोनाची दुसऱ्या स्तरातील लक्षणे दिसणाऱ्या दशलक्ष लोकसंख्येमागे किमान २०० खाटांची व्यवस्था करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्य़ात ८२० खाटा निर्माण करण्यात आल्या आहेत. तर गंभीर रुग्णांसाठी प्रतिदशलक्ष ३० अतिदक्षता कक्षातील खाटांची सोय केली जाणार आहे. मराठवाडय़ात ही संख्या नव्याने ५८५ ने वाढविली जाणार आहे. तर प्राणवायू सुविधांच्या खाटांची संख्या ४१०० ने वाढविण्यात येणार आहे.

मराठवाडय़ातील मार्च २०२० ते २०२१ कालावधीमधील प्रसूतीची संख्या तीन लाख १० हजार ५६ एवढी होती. या संख्येचा विचार करून नवजात मुलांसाठी स्वतंत्र खाटांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. कोविडने मुलांना घेरले तर १२४६ मुलांसाठी शिशू दक्षता विभागातील सोयही केली जाणार आहे. केवळ लहान मुलांना नाही तर त्यांच्या मातांसाठी खाटांची सोय केली जाणार असल्याने तिसऱ्या लाटेसाठी प्रशासन नव्याने तयारी करू लागले आहे. ही संख्या २४७१ पर्यंत वाढविली जाणार आहे.

खाटा वाढविण्यावर भर

औरंगाबाद शहरात नव्याने ८०० खाटा वाढविण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी घेतला आहे. बाजारपेठेतील गर्दी लक्षात घेता सकारात्मकतेचा दर वाढला तर निर्बंध वाढविले जातील असा इशारा आयुक्त पांडेय यांनी दिला आहे. मुखपट्टी आणि गर्दी कमी झाली तर तिसरी लाट येणार नाही अन्यथा पुन्हा एकदा संसर्ग वाढू शकतो, असे सांगण्यात येत आहे.

दरम्यान लसीकरण, एकदा करोना होऊन गेलेल्या रुग्णांची संख्या, प्रतिपिंड निर्माण झालेल्या व्यक्तींचे करण्यात आलेले सर्वेक्षण लक्षात घेता औरंगाबाद शहरात करोना विषाणूच्या विरोधात सामूहिक प्रतिकार शक्ती निर्माण झालेली असू शकते. मात्र, या वर्षी सिरो सर्वेक्षण करण्यात आलेले नाही. पण लाट आलीच तर तयारी सुरू करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. पण औषधे, प्राणवायू याचा तुटवडा पडणार नाही, अशी व्यवस्था करण्यावर भर दिला जात आहे.