मराठवाडय़ात अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाईचे ७२ टक्के पंचनामे पूर्ण झाले असून नेत्यांच्या दौरेच दोरे सुरू असताना पंचनाम्याचा वेग वाढवा, असे आदेश देण्यात आले आहेत. एक पंचनामा केला की उरले सुरले पीक पुन्हा वाया जाते. त्यामुळे पंचनाम्यास वेळ लागत आहे. परभणी आणि बीड जिल्ह्यातील पंचनाम्याची गती कमी असल्याची माहिती प्रशासकीय पातळवीर एकत्रित करण्यात आली असून परभणी एकूण क्षेत्राच्या २४.८० तर बीडमध्ये हे प्रमाण ५५.६९ टक्के एवढेच झाले होते. सहा लाख ६१ हजार हेक्टरावरील पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. अशा स्थितीमध्ये शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार या मंत्र्यासह विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टी झालेल्या भागात दौरे केले आहेत. नेत्यांचे दौरच दौरे असे चित्र दिसत असून त्यातही उस्मानाबाद जिल्ह्यातील पाहणी दौरे वाढले.

हिंगोली, उस्मानाबाद, जालना, लातूर, औरंगाबाद या जिल्ह्यंचा दौरा देवेंद्र फडणवीस यांनी केला. पवार यांच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचा दौरा झाला आणि त्याचबरोबर विरोधीपक्ष नेते फडणवीसही बांधांवर फिरले. तातडीने पंचानामे केले जातील,असे आश्वासन शासनाकडून दिले जात असून केवळ छायाचित्र हाच पंचनामा म्हणून गणला जाईल, अशी भूमिका घ्या, अशी सूचना फडणवीस यांनी केली. ज्या जिल्ह्यात सर्वाधिक दौरे झाले, त्या उस्मानाबाद जिल्ह्यात २० ऑक्टोबपर्यंत केवळ २८ टक्के पंचनामे झाले होते. हवामान खात्याने दिलेला अंदाज लक्षात घेता आणखी एक दिवस पाऊस येईल असे मानले जात आहे. मंगळवारी औरंगाबादमध्ये पुन्हा पावसाच्या सरी झाल्या.

दुपारनंतर आभाळ भरून येते आणि पुन्हा पाऊस पडत असल्याने पंचनामे करणे अवघड होत असल्याचे सरकारी यंत्रणेतून सांगण्यात येते.

दरम्यान, कापूस उत्पादकता निम्म्याहून अधिक घटेल असे सांगण्यात येत आहे. उंचवटय़ावर असलेल्या जमिनीमध्ये तूर थोडय़ाप्रमाणात हाती लागेल. मात्र, सोयाबीन पूर्णत: हातचे गेले असल्याचा दावा कृषी विभागातील अधिकारी करीत आहेत.  गेल्या काही दिवसांत पडलेल्या पावसामुळे २७ लाख शेतकऱ्यांचे पंचनामे करावे लागतील, असा प्रशासनाचा अंदाज होता.

आतापर्यंत २१ लाख ३३ हजार शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. गंगापूर तालुक्यातील भेंडाळा व तुर्काबाद येथे पुन्हा अतिवृष्टी झाली आहे. दररोज पावसाचे आकडे बदलत असल्याने प्रशासकीय पातळीवर पंचनामे करयाचे कसा असा पेच आहे तर दुसरीकडे दौऱ्यामुळे पंचनाम्याचा आग्रह वाढला आहे.