X

७५ हजार प्राध्यापकांच्या राज्यात जागा रिक्त

सद्यस्थितीत ११ अकृषी विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांच्या १ हजार २८ जागा रिक्त आहेत

राज्यात प्राध्यपकांच्या ७५ हजार जागा रिक्त असून प्राध्यापक सेवानिवृत्त झाल्यानंतर रिक्त जागांची भरतीच केली जात नाही. यामुळे मूलभूत शिक्षणाचा पायाच ठिसूळ केला जात असल्याचा आरोप एमफुक्टोच्या राज्य अध्यक्षा डॉ. ताप्ती मुखोपाध्याय यांनी केला. देशव्यापी एआयफुक्टो प्राध्यापक संघटनेशी संलग्न असलेल्या एमफुक्टो आणि बामुक्टो या संघटनेतर्फे देवगिरी महाविद्यालयात विभागीय मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. १९९८ च्या कार्यभारानुसार एकट्या महाराष्ट्रात अनुदानित आणि विनाअनुदानित शाळा, कॉलेजमध्ये ७५ हजार जागा रिक्त असल्याचा आरोप यावेळी ताप्ती यांनी केलाय.

समान काम करणाऱ्या एका प्राध्यापकाला लाख रुपये महिना आणि कंत्राटी प्राध्यापकाला दहा हजार रुपये महिना दिला जातो. यातून एकप्रकारची विषमता निर्माण होत आहे. ही नष्ट करण्यासाठी एमफुक्टो, एआयफुक्टो लढणार असल्याचेही मुखोपाध्याय यांनी स्पष्ट केले.

विद्यापिठांमध्ये एक हजार जागा रिक्त

सद्यस्थितीत ११ अकृषी विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांच्या १ हजार २८ जागा रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन आणि प्रशासन सांभाळणे कठिण झाल्याचे चित्र विद्यापीठांमध्ये निर्माण झाले आहे. अनेक विद्यापीठांमध्ये एक शिक्षकी विभाग कार्यरत असल्याची  धक्कादायक माहितीही समोर आली आहे. यामुळे तासिका, संशोधन ठप्प झाले आहे. एम.फिल., पी.एचडीचे संशोधनही थांबले आहे. ‘नॅक’ मानांकनांसह ‘रुसा’ अंतर्गत मिळणारे संशोधन प्रकल्प सादर करण्यासाठी तज्ज्ञ प्राध्यापक उपलब्ध नसल्याचा फटका विद्यापीठांना बसत आहे.