मनपातील ४६० शिक्षकांना दिलासा देणारा आदेश धडकला

औरंगाबाद : नगर परिषद, महानगर पालिकांकडून चालवण्यात येणाऱ्या शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर  कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येणाऱ्या सातव्या वेतन आयोगाच्या पाश्र्वभूमीवर सुधारित वेतनश्रेणी मंजूर करण्याबाबतची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश राज्याच्या शिक्षण व क्रीडा विभागाकडून धडकले आहेत. या निर्णयाने औरंगाबाद मनपाच्या शाळांमधील ४६० जणांना दिलासा मिळाला आहे.

राज्यातील नगरपालिका व महानगरपालिकांच्या शाळांमध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांची संख्या ३ हजार ८७ आहे. प्रत्यक्षात ही मंजूर संख्या ३ हजार २२१ आहे. तर कार्यरत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या ७२० आहे. तर मंजूर संख्या १ हजार १४ आहे.

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना १ जानेवारी २०१६ पासून करण्यासाठी नगर विकास विभागाच्या सहमतीने निर्णय घेणे  शासनाच्या विचाराधीन होते. त्याअनुषंगाने राज्याच्या शिक्षण विभागाचा आदेश धडकल्यानंतर आता महापालिका, नगर परिषद स्तरावर लगबग सुरू झाली आहे. या अनुषंगाने ३ जुलै रोजी शिक्षण व क्रीडा विभागाचे परिपत्रक काढण्यात आले आहे.

मनपाने ५० टक्क्य़ांची तरतूद करावी

नगरपालिकांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या अनुषंगाने शिक्षण विभागाने परिपत्रक जारी केले असून त्यादृष्टीने आता महानगरपालिकांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ५० टक्के रकमेची तरतूद ठराव घेऊन करावी. सोलापूर, अमरावती येथील मनपांनी असा ठराव घेतला आहे. ५० टक्के वाटा राज्य शासनाने शिक्षण संचालकांकडे जमा केलेला आहे.

– बाबूराव राठोड, अध्यक्ष, म. रा. प्राथमिक शिक्षक संघ, औरंगाबाद.