उमरगा रोटरी क्लबचा उपक्रम

येथील रोटरी क्लबच्या वतीने जिल्ह्यातील ८ शिक्षकांचा रोटरी राष्ट्रशिल्प पुरस्काराने गौरव करण्यात आला. तसेच उमरगा-लोहारा तालुक्यातील ७० शिक्षकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

शिक्षक दिन आणि आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, शिक्षणातून साक्षर भारत व गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांना रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट-३१३२ चा नेशन बिल्डर्स अ‍ॅवॉर्ड प्रदान करण्यात आला. यात छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव, अणदूर येथील जवाहर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनिता मुदकण्णा, माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्रा. महेश मोटे, शरणप्पा मलंग विद्यालयाचे मुख्याध्यापक अजित गोबारे, मुळज जिल्हा परिषद शाळेतील कवी शंकर मुगळे, स्वामी विवेकानंद प्रा. विद्यालयाचे गोपाळ आष्टे, केंद्रप्रमुख राजेंद्र गरड, जयराम विद्यालय, नारंगवाडीचे अनिल मदनसुरे आदींना रोटरी राष्ट्रशिल्प पुरस्कार डॉ. दीपक पोपळे, डॉ. संजय अस्वले, संतराम मूरजानी आदींच्या हस्ते प्रदान करण्यात आला. उमरगा व लोहारा तालुक्यातील ७० शिक्षकांनाही सन्मानपत्र व लेखणी देऊन सन्मानित करण्यात आले. बालाजी इंगळे यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला.