14 October 2019

News Flash

खिचडी खाण्यालाही मुलांकडून ‘सुटी’

शाळेत आठ-नऊ महिने खाल्लेली खिचडी उन्हाळ्याच्या सुटीतही खायची, अशी मुलांची प्रतिक्रिया.

संग्रहित छायाचित्र

शाळेत ८० टक्के मुलांची अनुपस्थिती

औरंगाबाद : उन्हाळ्यात शाळेकडे फेरफटका न मारता मुले सुटीचा आनंद लुटताहेत का, असा प्रश्न समोर आला तर त्याला ‘हो’ असे उत्तर मिळते आहे. कारण शाळांमध्ये दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर खिचडी शिजवून मुलांना खाऊ घालण्याची व्यवस्था केलेली असली तरी मुले मात्र शाळेकडे फिरकत नाहीत. खिचडी खाण्यासाठीची मुलांची अनुपस्थिती सुमारे ८० टक्के आहे, असे शिक्षण विभागाने केलेल्या पाहणीत समोर आले आहे. या पाहणीत शिक्षकही दांडी मारत असल्याचे आढळून आले आहे.

शाळेत आठ-नऊ महिने खाल्लेली खिचडी उन्हाळ्याच्या सुटीतही खायची, अशी मुलांची प्रतिक्रिया. तर सुटीतही शाळेत जाऊन मुले खिचडी खात असतील तर त्यातून आपलेच दारिद्रय अधिकच प्रकर्षांने समोर येईल, अशी पालकांची मानसिकता असावी, असे एक कारण मुलांच्या अनुपस्थितीमागे जोडले जात आहे.

औरंगाबाद जिल्ह्य़ातील जिल्हा परिषद शाळांमध्ये खिचडी शिजते की नाही, याची पाहणी नुकतीच शिक्षण विभागाने केली. त्यामध्ये पाहणी केलेल्या २१८ पैकी २७ शाळांमध्ये शिक्षक गैरहजर, तर ३७ शाळांमध्ये विद्यार्थी अनुपस्थित आढळले. गणोरी येथील शाळेत एकूण एक हजार विद्यार्थी आहेत. पैकी आता सुटीत खिचडी खाण्यासाठी केवळ ४० विद्यार्थीच उपस्थित होते. दुष्काळाची भीषणता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना या वर्षी सुटीतही खिचडी देण्याचे आदेश शिक्षण विभागाने काढले होते. त्यासाठी शिक्षकांना अर्जित रजाही मंजूर करण्यात आली होती. मात्र विद्यार्थीच शाळेत खिचडी खाण्यासाठी फिरकत नसल्याचे समोर आले. अनेक विद्यार्थी मामाच्या गावी तर काही नातेवाईक आदी संबंधितांच्या लग्न कार्यासाठी म्हणून पालकांसोबत बाहेर गावी गेले आहेत. ज्या पालकांचे हातावरचे पोट आहे त्यांचीच मुले खिचडी खाण्यासाठी शाळेत येत आहेत. अशा घरातील मुलांची संख्या केवळ २० टक्के आहे, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या खिचडीसाठी देण्यात आलेल्या पोषण आहाराचा विनियोग व्यवस्थित लागतो की नाही, याची पाहणी करण्यासाठी जिल्ह्य़ातील अनेक शाळांना भेटी देऊन पाहणी केली आहे. त्यामध्ये खिचडीसाठी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नगण्य आहे. खिचडी शिजवण्याचा आहाराच्या संदर्भाने यावेळी शालेय समिती अध्यक्ष, स्थानिक सरपंच व खिचडी शिजवणारी महिला यांचा अहवाल पाहिला जाणार आहे.

– सूरजकुमार जैस्वाल, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

First Published on May 15, 2019 4:18 am

Web Title: 80 percent children remain absence in school during summer vacation