वेगवेगळ्या विभागांतील ७२ संघटनांची शिखर संघटना असलेल्या राजपत्रित अधिकारी महासंघाचे राज्यभरात सव्वालाख सदस्य असून, यातील ८५ टक्के चांगले अर्थात धुतल्या तांदळासारखे असल्याचा दावा करीत उर्वरित १५ टक्क्य़ांपैकी १० टक्के जे काठावर आहेत, त्यांची नीतिमत्ता मजबूत करण्यासाठी त्यांना ‘पगारात भागवण्या’चा मंत्र देण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हावार कार्यशाळांचा उपक्रम सुरू आहे, असे प्रतिपादन संघटनेचे सरचिटणीस समीर भटकर यांनी गुरुवारी येथे केले.
औरंगाबाद महसूल विभागातील औरंगाबादसह चार जिल्ह्य़ांमधील कार्यशाळा यापूर्वी झाल्या. आता दुसऱ्या टप्प्यात नांदेडसह चार जिल्ह्य़ांत कार्यशाळा घेण्यात येत आहेत. या निमित्त भटकर यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनातील सभागृहात पत्रकारांशी संवाद साधला. संघटनेचे पदसिद्ध जिल्हाध्यक्ष निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपाध्यक्ष डॉ. उत्तम इंगळे, जयश्री गोरे, पाचंगे आदींची उपस्थिती होती.
भटकर म्हणाले की, राजपत्रित अधिकारी महासंघ सातत्याने विविध उपक्रम राबवते. यापूर्वी कार्यसंस्कृती अभियान हाती घेण्यात आले. शासकीय कार्यालयात आपले काम घेऊन येणाऱ्या सामान्य नागरिकाशी सौजन्याची वागणूक ठेवण्याचे आवाहन याद्वारे करण्यात आले. आता राज्य भ्रष्टाचारमुक्त करण्याचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प आहे. त्यासाठी ‘पगारात भागवा’ अभियान राबवले जात असून अतिरिक्त धनाची लालसा टाळा, असे आवाहन करण्यात येत आहे. राजपत्रित अधिकारी महासंघाच्या माध्यमातून हे अभियान राबवावे, असा मतप्रवाह पुढे आला. त्यानुसार राज्यभर त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पुढील दोन वर्षे हे अभियान महासंघ चालवणार असून त्यासाठी जिल्हावार कार्यशाळा घेण्यात येत आहेत.
राजपत्रित अधिकारी महासंघांतर्गत विविध विभागांतील ७२ संघटनांचा समावेश आहे. तब्बल १ लाख २५ हजार सदस्यांचा या संघटनेचा विस्तार आहे. पैकी ८५ टक्के अधिकारी सदाचारी आहेत. १० टक्के अधिकारी दोलायमान मानसिकतेतील असून ५ टक्के पूर्ण भ्रष्ट आहेत. त्यांना कोणीही सुधारू शकत नाही, या पातळीत ते गेले असल्याची कबुली भटकर यांनी दिली; परंतु काठावर असलेल्या १० टक्क्यांना सीमेच्या आत घेण्यावर संघटनेचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. अशा लोकांना संघटनेत स्थान नाही, सदस्यांपैकी कोणी दोषी आढळल्यास त्याला तात्काळ बाहेरचा रस्ता दाखवला जातो. दोषींवरील खटले जलदगती न्यायालयात चालवावे, त्यांच्यासाठी संघटना कधीही शासनाशी पत्रव्यवहार करणार नाही, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
नांदेडच्या वेगवेगळ्या विभागातील अधिकाऱ्यांच्या अरेरावी वागणुकीचा विषय या वेळी पत्रकारांनी उपस्थित केला. यावर माहिती घेऊ, असे उत्तर भटकर यांनी दिले.