सर्व शिक्षा अभियानामुळे अध्ययन-अध्यापनाच्या क्षेत्रात शिक्षकांनी मोठे बदल केले. शाळा डिजिटल करण्यापासून ते शिकविण्याच्या पद्धतीत बदल करणाऱ्या शिक्षकांनी नांदेड जिल्हय़ात टीव्ही बंद अभियान राबविले. गेल्या सहा महिन्यांत या अभियानाला ग्रामीण भागात कमालीचा प्रतिसाद मिळत असून ८८ पालकांनी त्यांच्या घरातील टीव्ही बंद ठेवला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुणवत्ता विकास अभियानाच्या निमित्ताने केलेल्या या प्रयोगाचे सर्वेक्षण शिक्षक दिनाच्या निमित्ताने करण्यात आले. ३५ हजार पालकांच्या या सर्वेक्षणाच्या ९ तालुक्यांतील माहितीच्या संकलनानुसार पालकांचा टीव्ही बंद ठेवण्याकडे कल वाढला असल्याचे दिसून आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी या अभियानामध्ये सायंकाळी ७ ते ९ या कालावधीत टीव्ही बंद ठेवण्याबाबतचे आवाहन केले होते. शिक्षकांनी या अनुषंगाने केलेल्या जागृतीमुळे या टीव्ही बंद अभियानास चांगला प्रतिसाद मिळत आहे.

नीरस आणि कंटाळवाण्या अध्यापन पद्धतीमुळे मुले शाळेतून गळतात, असा निष्कर्ष काढला जात असे. यावर काम करत नांदेड जिल्हा परिषदेतील शिक्षकांनी काम करायला सुरुवात केली. छोटय़ा संकल्पना विद्यार्थ्यांना कळाव्यात यासाठी शैक्षणिक साहित्याचा उपयोग सुरू झाला. अध्यापनात बराच फरक पडू लागला. मात्र, गुणवत्ता वाढवायची असेल तर पालकांचा सहभाग मिळविणे आवश्यक असल्याने विविध प्रकारचे उपक्रम हाती घेण्यात आले. किमान आई-वडिलांना आपला मुलगा नीट शिकतो आहे, हा संदेश देण्यासाठी मुलाने शाळेत येण्यापूर्वी त्यांच्या पाया पडावे, असा उपक्रम राबविण्यात आला. शिक्षक दिनानिमित्ताने हा उपक्रम कसा चालतो याचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ८९ टक्के मुले दररोज पाया पडतात. गावातील थोरामोठय़ांना नमस्कार करतात, असे आढळून आले आहे. अगदी छोटय़ा उपक्रमातून पालकांचा विश्वास मिळविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केले. परिणाम असा झाला, की गेल्या काही दिवसांत शाळांच्या सुधारणांसाठी ग्रामीण भागातील पालकांनी ४ कोटी रुपयांची लोकवर्गणी दिली. केवळ एवढेच नाही तर आर्थिक स्वरूपातील मदत करण्यास तब्बल ६१ टक्के पालक तयार असल्याचे या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. शिष्यवृती परीक्षेत ३६ क्रमांकावर असणाऱ्या नांदेड जिल्हय़ाचा क्रमांक पहिला व्हावा, यासाठी गुणवत्ता विकास अभियानात टीव्ही बंद ठेवण्याच्या उपक्रमामुळे चांगला उपयोग होत असल्याचा दावा नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी केला आहे.

३५ हजार पालकांचे सर्वेक्षण करून गुणवत्ता विकास अभियान किती रुजले आहे, हे तपासण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील मुलांच्या समस्याही समोर आल्या आहेत. विशेषत: गणित आणि इंग्रजी अध्यापनात कसे बदल करायचे याचा विचार केला जाईल, असेही काळे यांनी सांगितले.