उपक्रमांची रेलचेल; कार्यक्रम पत्रिका जाहीर

औरंगाबाद : उस्मानाबाद येथे होणाऱ्या ९३ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलन स्थळाचे संत गोरोबाकाका साहित्यनगरी असे नामकरण करण्यात आले असून मराठवाडी बाज आणि संस्कृती दिसावी असा प्रयत्न आयोजकांनी जाणीवपूर्वक केला असल्याचे कार्यक्रम पत्रिकेवरून दिसून येत आहे. उद्घाटक, मंडप आणि साहित्यमंचावरील नामकरणांवरून अस्सल मराठवाडी छाप दिसून येत आहे.

‘आजचे भरमसाठ काव्यलेखन : बाळसं की सूज’ या विषयावर पहिला परिसंवाद होणार असून अध्यक्षस्थानी डॉ. सुषमा करोगल असणार आहेत. यात डॉ. कैलास अंभोरे, डॉ. स्मिता जाधव, डॉ. श्रीकांत पाटील, अरुण म्हात्रे, सीमा शेटे-रोटे यांचा सहभाग असणार आहे. अण्णा भाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे ‘अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील जीवनजाणिवा’ यावरील परिसंवादाचे अध्यक्ष प्रा. बाळकृष्ण कवठेकर असतील. ऋषिकेश कांबळे, मोतीराम कटारे, डॉ. वृंदा कौजलगीकर, शाहू पाटोळे, ईश्वर नंदापुरे आदींची सहभाग असेल.

‘२१व्या शतकात लिहिल्या गेलेल्या मराठी साहित्यात वाचण्यासारखे काय आहे?’ या विषयावरील परिसंवादाचे अध्यक्षपद श्रीराम शिधये यांच्याकडे असेल. यात डॉ. दत्ता घोलप, डॉ. पी. विठ्ठल, डॉ. केशव तुपे, डॉ. कैलाश इंगळे, प्रा. संतोष गोनबरे, अभिराम भडकमकर हे सहभागी होणार आहेत. तसेच ‘संत साहित्याचे सामाजिक दृष्टीने पुरेसे आकलन न झाल्यामुळे समाजात बुवाबाजीचे प्रस्थ  वाढले/ वाढते आहे’ या विषयावरील परिसंवादाचे अध्यक्षपद ह.भ.प. राममहाराज राऊत यांच्याकडे असून सोमनाथ कोमरपंत, डॉ. मुरहरी केळे, धनराज वंजारी, मरतड कुलकर्णी, डॉ. सचिन जाधव हे सहभागी होणार आहेत.

ग्रंथदिंडी आणि ग्रंथप्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा होईल आणि त्यानंतर सायंकाळी ७.३० ते रात्री १०.३० पर्यंत निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे. याशिवाय ११ जानेवारी रोजी दुपारी साडेचार ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत ‘आमचे कवी, आमच्या कविता’ असाही कार्यक्रम होणार असून त्यात मराठवाडय़ातील बहुसंख्य कवी कविता सादर करणार आहेत.

दोन हजार कविंतापैकी सहाशे कवितांची निवड

साहित्य संमेलनात कविता सादर करण्यासाठी दोन हजार कविता आल्या होत्या. त्याची निवड करणे हे काम मोठे जिकिरीचे होते. तरीही ६०० कविता निवडण्यात आल्या आहेत, अशी माहिती स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिली.

काही सत्कार अनोखे

मराठी भाषेतील सकस कथाकार म्हणून भास्कर चंदनशिव यांचा सत्कार होणार आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या कारणांनी महाराष्ट्राबाहेर स्थलांतरित झाल्यानंतरही मराठी भाषिकांनी तेथील भाषा शिकली आणि त्या भाषेत साहित्यनिर्मिती केली. दिल्ली येते चहा विकून चरितार्थ चालविणारे अमरावती जिल्ह्य़ातील मराठी भाषिक पण हिंदीतील साहित्यिक लक्ष्मणराव चहावाले यांचाही सत्कार होणार आहे. सर्वसाधारणपणे महिला प्रकाशकांचा सत्कार होत नाही. या वर्षी पहिल्यांदाच श्रीरामपूरच्या शब्दालय प्रकाशनाच्या प्रकाशक सुमती लांडे यांचाही सत्कार आवर्जून केला जाईल, असे अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितले.

कार्यक्रम..

सामाजिक प्रश्नांवरील पाच परिसंवादांबरोबरच दोन कविसंमेलने, कथाकथन अशी साहित्यिक मेजवानी असलेल्या संमेलनात या वर्षी प्रतिभा रानडे यांची प्रकट मुलाखत होणार असून महात्मा जोतिराव फुले यांच्या ‘शेतकऱ्यांचे आसूड’ या ग्रंथावर अभ्यासकांची चर्चा होणार आहे. अरविंद जगताप आणि राम जगताप हे आजच्या पाच लक्षवेधी कथाकारांशी संवाद साधणार आहेत. बाळमेळावा आणि ‘गावकथा’ या नाटकाचा प्रयोगही संमेलनादरम्यान होईल.

मराठवाडी पगडा..

उद्घाटन कार्यक्रम १० जानेवारी रोजी दुपारी चार वाजता कवी ना. धों. महानोर यांच्या हस्ते होणार असून तत्पूर्वी तुळजापूरचा पारंपरिक गोंधळ स्वागताला असणार आहे. परंडा येथे तहसीलदार म्हणून काम करताना सेतुमाधवराव पगडी यांनी इतिहासाचे बहुतांश लेखन याच भागात केल्याने त्यांचे नाव एका मंडपाला देण्यात आले असून परंडा तालुक्यातील कुंभेफळचे मूळ रहिवासी असलेले शाहीर अमरशेख यांचे एका साहित्यमंचाला नाव देण्यात आले आहे. संमेलनाची कार्यक्रम पत्रिका शुक्रवारी स्वागताध्यक्ष नितीन तावडे व महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते वितरित करण्यात आली.

शिक्षक आणि सरकारी अधिकाऱ्यांचा मोठा हातभार

उस्मानाबाद हे मराठवाडय़ातील तसे मागास शहर. हवा-पाणी-तुळजाभवानी अशी ओळख, त्यामुळेच साहित्यिक आणि पुस्तकांविषयी अधिक आपुलकी या भागात आहे. साहित्य संमेलन होणार आणि त्यासाठी मोठा निधी लागेल, अशी चर्चा सुरू झाली आणि सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी संमेलनासाठी स्वत:च्या वेतनातून रक्कम जमा केली आहे. अगदीच दुष्काळी अशी जरी ओळख असली तरी पाहुणचार करू, काळजी करू नका, असे उस्मानाबादकर आवर्जून सांगत आहेत.