पूर्वी झालेल्या शासकीय मोजणीप्रमाणे शेतीची हद्द कायम ठेवून तक्रारदाराच्या बाजूने मोजणीच्या खुणा दाखविण्यास २ हजारांची लाच घेणाऱ्या भूम येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापक विनोद पांडुरंग मेंद्रे यास लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडून गजाआड केले.
भूम तालुक्यातील हिवर्डा येथील तक्रारदार शेतकऱ्याची एक हेक्टर २७ आर शेतजमीन आहे. तक्रारदाराच्या शेताशेजारील जमीनधारक यांनी त्यांच्या शेताची हद्द कायम करण्यास भूमी अभिलेख उपअधीक्षकांकडे मोजणी अर्ज केला. त्यावरून तक्रारदारास मिळालेल्या नोटिशीवरून १८ एप्रिलला तक्रारदार व त्यांची पत्नी शेतात हजर असताना विनोद पांडुरंग मेंद्रे हा भूमापक शेतात आला. त्याने तक्रारदारास सायंकाळी भूमी अभिलेख कार्यालयाकडे येण्यास सांगितले. तक्रारदार हे मेंद्रे याची भेट घेण्यास गेले. मेंद्रे याने तक्रारदारास शेताच्या पूर्वी झालेल्या शासकीय मोजणी कागदपत्रात व सध्या उपलब्ध रेकॉर्डमध्ये तफावत आहे. तरीही पूर्वी झालेल्या मोजणीप्रमाणे शेताची हद्द कायम करून तशा खुणा करून देण्यासाठी तक्रारदाराकडे ३ हजार रुपयांची मागणी केली. या वेळी तक्रारदाराने १ हजार रुपये मेंद्रे यास दिले. उर्वरित पशासाठी तक्रारदाराकडे तगादा लावला. तसेच चुकीची मोजणी करून तक्रारदाराचे नुकसान करण्याची धमकी दिली, अशी तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे दिली. त्यानुसार एसीबीच्या पोलीस उपाधीक्षक अश्विनी भोसले यांच्या पथकाने तालुका भूमी अभिलेख कार्यालयात सापळा लावला असता, तक्रारदाराकडे उर्वरित २ हजार रुपयांची लाच मागून ती घेताना मेंद्रे यास पकडण्यात आले.