राणाजगजितसिंह पाटील आणि अब्दुल सत्तार यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश घेतल्यानंतर भाजपतील एक गट कमालीचा अस्वस्थ झाला आहे. हे दोन्ही मतदारसंघ युतीतील विरुद्ध पक्षांकडे असल्यामुळे युती होईल की नाही या चर्चेला नवे वळण मिळू लागले आहे. राणा जगजितसिंह पाटील यांना उस्मानाबाद मतदारसंघातून कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवता येणार नाही. कारण हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे, तर अब्दुल सत्तार यांना भाजपाचा दावा असणाऱ्या सिल्लोड मतदारसंघात धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणूक लढवता येईल का, असा प्रश्न कार्यकर्ते विचारत आहेत. युतीमध्ये समन्वयात जागा सोडवून घेण्यासाठी या दोन्ही नेत्यांना विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.

डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या उस्मानाबाद जिल्ह्य़ातील राजकारणाचा पोत लक्षात घेता त्यांनी निर्माण केलेले ‘भयपर्व’ आता भाजपला मान्य आहे का, असा सवाल जुने कार्यकर्ते करू लागले आहेत. भाजप- परिवारातील संघटनांमधील काही कार्यकर्त्यांनी राणाजगजितसिंह पाटील यांना प्रवेश देण्यापूर्वीही पक्षांतर्गत आक्षेप नोंदवले होते. मात्र, ते जुमानले गेले नाहीत. त्यामुळे भाजपमधील अनेक कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. मतदारसंघात समन्वय घडवून आणावा आणि जागांची अदलाबदल करावी, एवढे बाहेरून आलेले नेते मोठे कसे, असाही प्रश्न विचारला जात आहे.

सिल्लोड मतदारसंघातही अशीच अस्वस्थता आहे. भाजपमध्ये येण्यासाठी राजकीय अर्थाने उतावीळपणा दाखविणाऱ्या सत्तार यांनी अचानकपणे शिवसेनेत प्रवेश घेतला. त्यामुळे सिल्लोड मतदारसंघ सेनेला सोडायचा कसा, असा प्रश्न विचारला जात आहे. अन्य पक्षातून आलेल्या नेत्यांसाठी जागांची प्रस्तावित अदलाबदल वरिष्ठांनी का मान्य करावी? मग स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी  काय करावे, असा प्रश्नही समाजमाध्यमातून विचारला जाऊ लागला आहे. या चर्चेमुळे युती होणार की नाही, अशा शंकाही भाजप-सेनेतील कार्यकर्ते जाहीरपणे बोलू लागले आहेत.