करोना विषाणूची तीव्रता कमी होत असल्याचे चिन्ह दिसू लागली आणि अर्थचक्राला गती देण्याची प्रक्रिया आता वेग धरू लागली आहे. दुचाकी आणि चार चाकी उत्पादनांचे आलेख वाढत आहेत. औरंगाबादमधील मद्यानिर्मिती आणि विक्रीतून १५०० कोटी रुपयांपर्यंतचा कर भरणा मागील सहा महिन्यात झाला आहे. पूर्वीची गती मिळत असतानाच वैद्यकीय उपकरणासाठी पार्क करण्याची प्रक्रिया दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयलच्या ‘औरिक सिटी’मध्ये होणार आहेत. या पार्कमधील उद्योगांसाठी राज्य सरकारकडून मोठय़ा सवलती देण्यात आल्या आहेत. यामध्ये दहा वर्षांसाठीचा वीज दर एक रुपया पाच पैसे प्रतियुनिट एवढा राहिला आहे. भूखंड खरेदी,भाडेपट्टा, बँक कर्ज, गहाणखत यासाठी मुंद्राक शुल्क माफी ही देण्यात आली आहे. ‘डिएमआयसी’ मधून आता मोठय़ा प्रमाणात उत्पादने सुरू झाली आहेत. पायाभूत सुविधामध्ये औरंगाबादचा क्रमांक राज्यात वरचा असल्याने येथे उद्योग उभे राहतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

केंद्र शासन चार वैद्यकीय उपरणे पार्क उभे करणार आहे.  वैद्यकीय उपकरण निर्मिती पार्क निर्मितीमधील सामुहिक मुलभूत सुविधा उभी करण्यासाठी शंभर कोटी रुपयांचे अनुदानही देण्यात येणार आहे. सामुहिक सुविधा केंद्राचा चांगला उपयोग होत असल्याचा अनुभव औरंगाबादमधील उद्योजकांना आहे. ‘मराठवाडा ऑटो क्लटर’ हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे वैद्यकीय उपकरणाच्या क्षेत्रातही अशी सुविधा गती देणारी ठरणार आहे. राज्यात विक्री होणाऱ्या प्रथम विक्रीच्या वस्तू सेवा कराचे १०० टक्के अनुदान, अनुदान असे पर्यंत विद्याुत शुल्क माफी तसेच पुढील दहा वर्षे वीज सवलत असल्याने अनेक जण या क्षेत्राकडे वळतील असे सांगण्यात येत आहे. या वैद्याकीय उपकरण पार्काची प्रकल्प किंमत ४२४ रुपये आहे.

औरंगाबाद शहरातील शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे दोन हजार हेक्टरवर पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. पाणी, वीज, टेलीफोन लाईन यासह सर्व अत्याधुनिक सेवा कार्यान्वित असल्याने सध्या ४० कंपन्यांचे बांधकाम सुरू असून दहा कंपन्यांमधून उत्पादनही सुरू झाले आहे. तीन हजार कोटीहून अधिकची गुंतवणूक असणारी हौसंग, ओवर लिकॉन ही कोटींग क्षेत्रातील स्वीस कंपनी, कोटोल इंडे ही बहुराष्ट्रीय कंपनी, ऑरो टुल्स यासह विविध कंपन्या सुरू झाल्या आहेत. शेंद्रा हे उद्योग विकासाची गती वाढविणारे केंद्र ठरू लागले आहे.  संरक्षण क्षेत्रासाठी लागणारे साहित्य पुरविणाऱ्या कंपन्याही सुरू झाले आहे. दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल पट्टयातील बिडकीन येथे आठ हजार हेक्टरापैकी अडीच हजार हेक्टर जमिनीवर आता नव्याने पायाभूत सुविधा करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे औरंगाबाद हे मोठे आद्योगिक केंद्र बनेल या विषयी उद्योजक कमालीचे सक्रिय आहेत. त्याला आता शासनाकडूनही प्रोत्साहन देण्यात येत आहे.  करोनानंतर उद्भवलेली औषधांची स्थिती लक्षात घेत केंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेत वैद्याकीय उपकरणाचे पार्क औरंगाबादमध्ये करण्याचे ठरविले आहे. नव्याने सुविधा मिळणार असल्याने या क्षेत्रात नवी गुंतवणूक वाढेल अशी शक्यता आहे. करोनाकाळात व्हेंटीलेटर तयार करण्यातही काही कंपन्यांनी पुढाकार घेतला होता. रोबोच्या मदतीने औषधे देण्याचा प्रयोगही करोनाच्या पहिल्या टप्प्यात करण्यात आला.