News Flash

महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्याचा हकनाक बळी

पैठण तालुक्यातील घटना

मृत शेतकरी दादासाहेब कुंडलीक टेकाळे

पैठण तालुक्यातील केकतजळगावात विजेच्या धक्क्याने एका शेतकऱ्याचा नाहक बळी गेला. दादासाहेब कुंडलीक टेकाळे (वय ३५) असं अपघातात मृत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतात जात असताना जमिनीवर पडलेल्या खांबाच्या तारेचा धक्का बसल्याने हा अपघात घडला.
रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतातील विद्युत खांब पडला होता. खांब जमिनीवर पडला असून देखील महावितरण विभागाने याकडे दुर्लक्ष केले. खांबातील विद्युत प्रवाह खंडीत न केल्यामुळे ही दुर्घटना घडली.

विजेचा धक्का लागल्यानंतर टेकाळे यांचा आवाज ऐकून त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत दोरी व लाकडाच्या साहय्याने त्यांना विद्युत खांबापासून दूर केले. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्यांना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु तेथे वैद्यकीय आधिकारी उपस्थित नसल्याने बराच वेळ गेला. उशीरा आलेल्या डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करुन रुग्णाला औरंगाबादला नेण्याचा सल्ला दिला. औरंगाबाद शहराकडे  जात असताना अर्ध्या वाटेतच शेतकऱ्याने प्राण सोडले.

या परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी विद्युत खांब दुरुस्तीची मागणी केली होती. पण महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यांनी विद्युत खांबाची वेळीच दुरुस्ती केली असती, तर आज ही दुर्घटना घडली नसती, असा आरोप गावातील नागरिकांनी केला. या घटनेनंतर महावितरणच्या संबंधित कर्मचाऱ्यावर खूनाचा गुन्हा दाखल करा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मृत टेकाळे यांच्या नातेवाईकांनी घेतली. नातेवाईकांच्या भूमिकेमुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्यानंतर महावितरण उपविभागीय आधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी घटनेचा आढावा घेऊन लाईनमन कृष्णा गोरे याला निलंबित केले. कर्मचाऱ्यावर कारवाई झाल्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2017 8:17 pm

Web Title: accident in paithan the death of youth farmer of shock
Next Stories
1 खासदार राऊत यांच्या वक्तव्यामुळे जैन समाजात असुरक्षिततेची भावना
2 बँक अधिकाऱ्यासह पत्नीची हत्या
3 औरंगाबादमध्ये राहत्या घरात प्राध्यापिकेचा मृतदेह आढळला!
Just Now!
X