वेगमर्यादेला फाटा

औरंगाबाद : शहरातील रस्त्यावरील वाहतूक सुरक्षिततेची तपासणी करणाऱ्या सर्वेक्षणात औरंगाबादकर सुसाट गाडय़ा चालवित असल्याचे दिसून आले आहे. ‘परिसर’ या स्वयंसेवी संस्थेने औरंगाबाद, नागपूर, नाशिक आणि पुणे या मोठय़ा शहरातील वाहतूक वेग मर्यादेबाबतचे सर्वेक्षण केले. औरंगाबाद शहरातील १० रस्त्यांवर वेगमर्यादेचे हे सर्वेक्षण ‘औरंगाबाद फस्ट’ च्या मदतीने करण्यात आले.  शहरातील दहा रस्त्यांवरील १२,५८३ वाहनांचे सर्वेक्षण केल्यानंतर दहापैकी सात रस्त्यांवर ६० टक्के गाडय़ा वेगाचे बंधन पाळत नसल्याचे दिसून आले आहे. औरंगाबाद-पैठण रस्त्यावर इटखेडय़ाजवळ तर गाडी वेगवान पळविण्याची शर्यत लागली असल्यासारखे वातावरण असते. या सर्वेक्षणात ९० टक्के वाहने वेगमर्यादेचे उल्लंघन करीत असल्याचे दिसून आले आहे.

बीड वळण रस्त्यावरील अपघात तर नित्याचीच बाब झाल्याने पोलीस आयुक्तांना रस्त्यावर उतरून नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करावी लागत होती. करोना टाळेबंदी असताना आणि वाहतूक वर्दळ कमी असतानाही वेगमर्यादा पाळण्याचे भान राहिले नसल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले आहे. राज्यातील इतर चार शहरांपैकी सर्वेक्षणासाठी औरंगाबाद शहरातील वाहनांची सर्वेक्षणाची संख्या अधिक होती. पैठण रस्ता वगळता शहरातील अन्य मार्गावरील वेग मर्यादा तशी फारशी वेगाची किंवा मर्यादा उल्लंघन करणारी नसते. शहरातील बहुतांश रस्त्यांची वेगमर्यादा ४० किलोमीटर प्रतितास अशी आहे. पण त्यापेक्षाही वेगाने वाहने पळविली जातात. विशेषत: चारचाकीचा वेगही अधिक असतो. बेफामपणे दुचाकी चालविणारे कमी नाहीत. गेल्या काही दिवसांत चौकाचौकात टाळेबंदीच्या अंमलबजावणीसाठी पोलीस चौकाचौकात उभे असल्याने दुचाकीस्वारांचे धाडसी प्रात्यक्षिक करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पण सर्वेक्षणात औरंगाबाद सुसाट असल्याचेच दिसून आले आहे.

असा आहे ‘परिसर’च्या पाहणीचे निष्कर्ष

रस्त्याचे नाव         सर्वेक्षण केलेल्या वाहनांची संख्या          वेगमर्यादा       उल्लंघन

औरंगाबाद-पैठण                     १४४४                            ३० ते ४०    ९६ टक्के

औरंगाबाद-जळगाव                     १०६८                             ४०           ८३ टक्के

औरंगाबाद-मुख्य रस्ता                 १४८८                             ४०          ४३ टक्के

बीड वळण रस्ता                           ९३५                               ४०        ८७ टक्के

औरंगाबाद-जालना                      १४११                               ४०         ६१ टक्के

औरंगाबाद-नगर                         १३३०                              ४०        ९० टक्के

औरंगाबाद-एमजीएम रोड            १२४५                               ४०         ५५ टक्के

गोलवाडी टी पॉइंट                       ८५४                               ४५         ७४ टक्के

एस. पी. ऑफिस                         १२२५                              ४०         २९ टक्के

औरंगाबाद-सी.पी. रोड                  १४८३                             ४०         ५९ टक्के

* दहापैकी सात रस्त्यांवर ६० टक्के  वेगमर्यादेचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. औरंगाबाद-नगर, औरंगाबाद-पैठण या रस्त्यांवर वेगमर्यादेचे उल्लंघन ९० टक्के असल्याचे दिसून आले.

* दहापैकी पाच रस्त्यांवर दुपारी तीन वाजेपर्यंत वेगमर्यादा अधिक असते. चारचाकी वाहनांचा वेग सर्व रस्त्यांवर सुसाटच असतो.