09 December 2019

News Flash

‘पृथ्वीराज चव्हाणांचे आरोप अर्धवट माहितीच्या आधारे’!

मुख्यमंत्रिपद सांभाळलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी अर्धवट माहितीच्या आधारे आरोप करणे शोभणारे नाही, असा टोला लगावतानाच माझ्यावरील कुठल्याही आरोपात तथ्य आढळेल तेव्हा कोणावर राजीनामा मागण्याची वेळ

शिक्षणमंत्री विनोद तावडे

मुख्यमंत्रिपद सांभाळलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी अर्धवट माहितीच्या आधारे आरोप करणे शोभणारे नाही, असा टोला लगावतानाच माझ्यावरील कुठल्याही आरोपात तथ्य आढळेल तेव्हा कोणावर राजीनामा मागण्याची वेळ येणार नाही, अशी स्पष्टोक्ती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ व अन्य कार्यक्रमांसाठी तावडे येथे आले होते. तत्पूर्वी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी भाजपशी संबंधित वृत्तपत्र व त्यातील सहभागावरून तावडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावर तावडे म्हणाले, की पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेले आरोप ऐकून आश्चर्य वाटले. पण ते म्हणतात तशी वस्तुस्थिती नाही. मी त्या कंपनीचा भागीदार नव्हेतर केवळ मानद संचालक होतो. केवळ अर्धवट माहितीच्या आधारे राजीनाम्याची मागणी करण्यात आली असल्याने राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही. चव्हाण अशी अर्धवट माहितीवरील प्रकरणे समोर आणत असतील तर त्यांनी आईच्या नावावर १० टक्के कोटय़ातून घर कसे घेतले? आज त्यांच्या पश्चात ते घर कोण वापरते, हे प्रकरण आम्ही समोर आणू शकलो असतो, पण ते आम्ही बाहेर आणले नाही, याकडे तावडे यांनी पत्रकारांचे लक्ष वेधले.
नवीन विद्यापीठ कायद्यातील काही तरतुदींबाबत सर्वाशी चर्चा करून सहमती घडवून आणली जात आहे. कुलगुरूंच्या अधिकारांच्या विषयावर मध्यममार्ग शोधला असल्याचे तावडे यांनी सांगितले.
दरम्यान, स्वारातीम विद्यापीठाचा १८वा दीक्षान्त समारंभ विद्यापीठ परिसरातील दीक्षान्त मंचावर पार पडला. या वेळी प्रमुख अतिथी या नात्याने पारंपरिक पद्धतीने छापील दीक्षान्त भाषण न वाचता तावडे यांनी उत्स्फूर्त भाषण केले. जगात ज्ञानाधिष्ठित क्रांतीचे पर्व सुरू झाले आहे, याकडे उपस्थित विद्वान, प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून आपल्याकडे आता शिक्षण हे माहितीप्रधान असण्यापेक्षा ज्ञानप्रधान असायला हवे. ‘घोका आणि ओका’ असे त्याचे स्वरूप असू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. समाजातील सर्व स्तरापर्यंत शिक्षण पोहोचविण्याचे आव्हान आपल्यासमोर असून स्वारातीम विद्यापीठाने ते पेलले असल्याचे तावडे यांनी नमूद केले. तावडेंच्या भाषणापूर्वी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी विद्यापीठाची एकंदर कामगिरी व वाटचालीची माहिती दिली.

First Published on February 27, 2016 1:40 am

Web Title: accusation of prithviraj chavan on vinod tawde
Just Now!
X