जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

औरंगाबाद : महिलेला शिवीगाळ करून छेड काढणाऱ्यास जाब विचारणाऱ्याचा खून केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. के. कुलकर्णी यांनी गुरुवारी सुनावली. राजेश उर्फ राजू भंगारवाला (वय ४०, मूळ रा. मध्यप्रदेश, ह. मु. गारखेडा) असे आरोपीचे नाव आहे.

खुनाची घटना विजयनगरात ३ ऑक्टोबर २०१६ रोजी घडली. याप्रकरणी गारखेडा परिसरातील अल्ताफ कॉलनी येथे राहणारे शेख शाहेद शेख सज्जाद यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, फिर्यादीचे भाऊ तथा मृत शेख सादेक शेख सज्जाद (३०) हे विजयनगर परिसरात गॅरेज चालवित होते. आरोपी राजेश उर्फ राजू हा नेहमी शेख सादेक यांच्या गॅरेजवर समोर येऊन बसायचा व येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना शिवीगाळ करून वारंवार छेड काढत होता. घटनेच्या दिवशीही आरोपी महिलांची छेड  काढू लागला. आरोपीच्या या कृत्याला कंटाळून सादेक यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्याने सादेक यांनाच शिवीगाळ केली व रागाच्या भरात घरी निघून गेला. काही वेळाने आरोपीने घरातून चाकू घेतला व पत्नी समवेत गॅरेज समोर आला. त्याने सादेक यांना बाजूला बोलावून घेत त्यांना भोसकले. यात त्यांचा मृत्यू झाला. सुनावणीदरम्यान सहायक लोकाभियोक्ता विनोद कोटेचा यांनी ९ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. यात मृताचा भाऊ, प्रत्यक्षदर्शी व तपास अधिकारी तत्कालीन उपनिरीक्षक एस.पी. बनसोड यांचा जबाब महत्त्वाचा ठरला. साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपी राजेश उर्फ राजू याला जन्मठेप व २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठाविली. तसेच आरोपीला ठोठाविण्यात आलेला दंड मृताच्या पत्नी व वारसांना नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. गुन्ह्यत तपास अधिकारी उपनिरीक्षक अवारे, तर पैरवी अधिकारी म्हणून दीक्षित यांनी काम पाहिले.