महसूल प्रशासनाने सील ठोकले

उस्मानाबाद तालुक्यातील पिंपरी, चिलवडी परिसरात जनावरांच्या हाडापासून पावडर आणि तेल तयार करणारे सहा अनधिकृत कत्तल कारखाने बंद करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण यांनी दिल्यानंतर बुधवारी उस्मानाबादच्या तहसीलदार आणि मंडल अधिकाऱ्यांनी या सहाही कारखान्यांना सील ठोकले.

उस्मानाबाद तालुक्यातील पिंपरी आणि चिलवडी परिसरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, लातूर किंवा उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेता, जनावरांच्या हाडापासून पावडर आणि तेल तयार करण्याचे अनधिकृत कत्तल कारखाने सुरू होते. त्यामुळे पपरी, सुर्डी, झरेगाव, वलगुड, जुनोनी, राघुचीवाडी इत्यादी गावांतील लोकांना उग्र वास येत होता. त्याचबरोबर या भागात मोकाट कुत्र्यांचा वावर मोठय़ा प्रमाणात वाढला होता. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले होते. उग्र वासामुळे मजूर कामावर येत नव्हते. तसेच कुत्र्यांनी चावा घेण्याचे प्रकार वाढले होते. त्याचबरोबर या कारखान्यातील प्रदूषित पाणी नदीच्या पात्रात सोडले जात असल्याने ते पाणी पिऊन जनावरांचा तसेच शेळ्यांचा मृत्यूदेखील होत होता.

या अनधिकृत कारखान्याविषयी लोकांनी तक्रारी केल्यानंतर उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण यांनी हे सर्व अनधिकृत कारखाने बंद करण्याचा आदेश दिला होता. हा आदेश प्राप्त झाल्यानंतर उस्मानाबादच्या तहसीलदार आणि मंडल अधिकाऱ्यांनी या कारखान्यास बुधवारी सील केले. त्यात मुद्देशीर कुरेशी यांचा अलकुशेर बोन मिल, अलिम कुरेशी यांचा एमन एन्टरप्रायजेस, सिफा बोन आणि फर्टीलायझर्स व अन्य तीन अशा एकूण सहा कत्तल कारखान्यांचा समावेश आहे.

कारखान्याचे मालक मुंबई आणि हैदराबादचे रहिवाशी असल्याचे उघड झाले आहे. रोज २० टन माल एका कारखान्यातून मुंबईला पाठवला जात होता.

दुर्गंधीमुळे वैतागलेल्या ग्रामस्थांनी १० वष्रे लढा दिल्यावर ही कारवाई झाली. या कारवाईवेळी एकाच कारखान्याचे मालक उपस्थित होते. बाकीचे मालक आणि परप्रांतीय कामगार पळून गेले. त्या मालकांमी ग्रामस्थांचे सर्व आरोप फेटाळले असले, तरी हाडांच्या भुकटीपासून काय बनत होते ते माहीत नसल्याचे मान्य केले आहे.