बीड, जालना, लातूरमधील धोका कायम

औरंगाबाद: प्राणवायू कमतरतेवर मात करत मराठवाडय़ातील जिल्हाधिकारी अक्षरश: एक तासाचा गजर लावून झोपत होते. परिस्थिती आता काहीशी नियंत्रणात आली असून रुग्णसंख्या घसरणीला लागली आहे. औरंगाबाद शहरातील रुग्णसंख्या आता प्रतिदिन चारशेपर्यंत खाली आली असून गेल्या आठवडय़ापर्यंत असणारा ग्रामीण भागातील संसर्गाचा दरही कमी झाला आहे. मराठवाडय़ात बीड वगळता अन्य सर्व जिल्ह्य़ातील संसर्ग आता एक हजाराच्या खाली आला आहे. पण ग्रामीण भागातून गंभीर स्थितीमध्ये रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याने प्रतिदिन मृत्यूचा आकडा वाढलेलाच आहे. औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्य़ातील मृत्यू संख्या जास्त आहे.  गेल्या चार दिवसापासून प्राणवायू पुरवठय़ाची स्थिती आणि निर्मिती प्रकल्पातून प्राणवायू मिळण्याची क्षमता वाढली असल्याने मराठवाडय़ाला दिलासा मिळू लागला आहे.

प्राणवायूची कमतरता जाणवण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी त्याचे नियोजन हाती घेतले. विद्यात प्रकल्पातील प्राणवायू निर्मितीचे प्रकल्प गरज असणाऱ्या जिल्ह्य़ात स्थलांतरित करता येतील आणि त्यातून रुग्णांना आवश्यक असणारा ९५ टक्के शुद्ध प्राणवायू पुरवठा करता येईल अशी सूचना त्यांनी राज्य स्तरावर मांडली. वीज निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर परळी येथील एक प्राणवायू निर्मितीचा प्रकल्प अंबाजोगाई येथे स्थलांतरित करण्यात आला. याच काळात जालना येथील स्टील उद्योगातील प्राणवायूचा प्रकल्प अधिग्रहित करण्यात आला. तसेच अन्य स्टील उद्योगातील प्राणवायू पुरवठा पूर्णत: थांबविण्यात आला. लातूर आणि बीड येथे प्राणवायू न मिळाल्याने मृत्यू झाल्याचे दोन आरोपवगळता प्राणवायू पुरवठय़ावर अधिकाऱ्यांना जागता पहारा ठेवावा लागला. रात्री दीड-दोन वाजता किंवा पहाटे चार वाजता प्राणवायूचा टँकर पोहचला असे म्हटल्यानंतरच जिल्हाधिकारी सुटकेचा नि:श्वास टाकत.

जेमतेम का असेना, पण अपुऱ्या प्राणवायूने घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे आता सांगण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्य़ात आता पाच प्राणवायू प्रकल्प सुरू होत असून अंबाजोगाई येथे हस्तांतरित केलेल्या प्राणवायू प्रकल्पातून सोमवारी २५ रुग्णांना प्राणवायू पुरवठा करण्यात आला. अंबाजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता शिवाजी सुक्रे म्हणाले, येत्या आठ -दहा दिवसात सर्व तांत्रिक अडचणी दूर होतील आणि सर्व रुग्णांपर्यंत नव्या प्रकल्पातून प्राणवायू पुरवठा होईल. त्यामुळे ४० टक्के मागणी कमी होणार आहे.

आता सर्व जिल्ह्य़ात प्राणवायू खाटा रिकाम्या दिसू लागल्या आहेत. पण येथून पुढे तिसऱ्या लाटेची तयारी आवश्यक असल्याने आरोग्य आणि महसूल यंत्रणा टिच्चून काम करत आहे.

औरंगाबाद जिल्ह्य़ातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.१९ एवढे होत असून करोना संसर्गाचा प्रति शंभरी असणारा दर आता १३.३४ वर आला आहे. बीड, जालना, लातूर या जिल्ह्य़ातील संसर्ग धोका अद्यााप कायम आहे. रेमडेसिविरची कमतरता वगळल्यास परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला जात आहे. एका बाजूला रुग्णवाढ कमी होत असली तरी लसीकरणाचा वेग मात्र कायम ठेवला जाईल असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात येत आहे. लस पुरवठा नीट झाला तर या समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग निर्माण होईल असेही सांगण्यात येत आहे. तूर्त दिलासा देणाऱ्या या वातावरणत कोविड नियमांचे उल्लंघन करू नये, असे आवाहन केले जात आहे.