News Flash

शैक्षणिक गुणांवर जीवन तोलू नका

अभिनेते सुबोध भावे म्हणाले, महाराष्ट्राचा वारकरी हा विठ्ठलाचे दर्शन होईलच म्हणून वारीला बाहेर पडत नाही

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे आयोजित केंद्रीय युवक महोत्सवातील क्षणचित्रे.

अभिनेते सुबोध भावे यांचा युवकांना सल्ला

औरंगाबाद : शिक्षणातील गुण, टक्केवारीवर विद्यार्थ्यांनी जीवनाचे मोल तोलू नये. गुण, टक्केवारी हे आयुष्य ठरवत नसतात. विद्यार्थ्यांनी कमी गुण मिळाले किंवा एखाद्या स्पर्धेत अपयश आले तर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये. आपण बारावीत तीन विषयांत नापास झालेलो आहोत; पण अभिनयाच्या क्षेत्रात ओळख निर्माण करू शकलो, असे सांगत अभिनेते सुबोध भावे यांनी युवकांनी जीवन हे आनंद निर्मितीचा एक प्रवास असून स्वतसह इतरांच्या आयुष्यात आनंदाची पेरणी करण्याची कलाही शिकून घेण्यासाठी युवक महोत्सव हे माध्यम असल्याचे प्रतिपादन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात केंद्रीय युवक महोत्सवाचे उद्घाटन भावे यांच्या हस्ते बुधवारी दुपारी झाले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रो. बी. ए. चोपडे होते. व्यासपीठावर प्र-कुलगुरू अशोक तेजनकर, विद्यापीठाचे माजी विद्यार्थी तथा अभिनेते उमेश जगताप, प्रो. मुस्तजीबखान, प्रा. डॉ. वाल्मीक सरवदे, प्रा. संभाजी भोसले, प्रा. दासू वैद्य आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अभिनेते सुबोध भावे म्हणाले, महाराष्ट्राचा वारकरी हा विठ्ठलाचे दर्शन होईलच म्हणून वारीला बाहेर पडत नाही. पण त्याला त्या वारीत चालण्याचा आनंद घ्यायचा असतो. वारीतला आनंद हा चालण्यात आहे. अनेक वारकरी केवळ विठुरायाच्या मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन परतात. वारकऱ्याला काही महावारकरी व्हायचे नसते. विद्यार्थ्यांनीही युवक महोत्सव, परीक्षा यातून काही शिकणे महत्त्वाचे मानावे. आयुष्य हे जन्म व मृत्यूदरम्यानच्या काळातील एक शिक्षणच आहे. औपचारिक शिक्षण शाळा-महाविद्यालयांमध्ये तर अनौपचारिक शिक्षण आयुष्याच्या प्रवासात मिळत असते आणि त्यातूनच माणूसपणाचे संस्कार आपल्यावर घडतात. विद्यार्थी राहण्यातही एक गंमत असून महाविद्यालयीन युवकांनी युवा महोत्सवाच्या माध्यमातून कला सादर करताना स्वतसह दुसऱ्यांनाही आनंद देण्यासाठी काम करावे, असा सल्ला दिला.

अभिनेते उमेश जगताप यांनी आपण परंडा तालुक्यातील आसूसारख्या ग्रामीण भागातून आलेलो असून या विद्यापीठाचा विद्यार्थी म्हणून अभिमान वाटत असल्याचे सांगितले. महोत्सवाच्या माध्यमातील यश-अपयशापेक्षा आपल्यातील कलावंत टिकेल, यावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कुलगुरू प्रो. बी. ए. चोपडे यांनी मराठवाडा भूमीला लाभलेल्या ऐतिहासिक परंपरेची ओळख करून दिली. संगीतरत्नसारखा ग्रंथ हा १२३७ साली देवगिरीच्या परिसरात यादव घराण्याच्या काळात लिहिला गेल्याचे प्रतिपादन केले. उद्घाटनानंतर प्राध्यापक, परीक्षकांची बैठक झाल्यानंतर विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली. महोत्सव चार दिवस चालणार आहे. २९ सप्टेंबर रोजी अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2018 8:07 am

Web Title: actor subodh bhave advice youth on education
Next Stories
1 दुष्काळासाठी मुख्यमंत्र्यांनी मराठवाडय़ात बैठक घ्यावी
2 पोलीस उपायुक्त श्रीरामेंचा अटकपूर्व जामीन नामंजूर
3 केळकर समितीचा अहवाल गुंडाळणार?
Just Now!
X