गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या झळा तीव्र बसत आहे. दिवसा कडक ऊन आणि रात्री थंडी असे वातावरण आहे. पाऊस झाला नसल्याने नोव्हेंबर महिन्यातच पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. जिंतूर, परभणी, पूर्णा या शहरासह अनेक गावांचा पाणीपुरवठा अवलंबून असणाऱ्या येलदरी धरणातील पाणीपातळीत झपाटय़ाने घट होत आहे. सध्या केवळ या धरणात १४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
या वर्षी एकही मोठा पाऊस झाला नसल्याने सर्वच जलसाठे कोरडेठाक आहे. पावसाळ्यातच जिल्हाभरात पाणीटंचाईला सुरुवात झाली होती. सध्या नोव्हेंबर महिना अर्धा संपलेला असतानाच शहरासह ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई सुरू झाली आहे. ग्रामीण भागातल्या पाणीपुरवठय़ाच्या अनेक योजना बंद पडल्या आहेत. जिल्ह्यात पूर्णा नदीवरील येलदरी हा सर्वात मोठा प्रकल्प असून परभणी, िहगोली आणि नांदेड  जिल्ह्यांतील नागरिकांची तहान या प्रकल्पावर भागविली जाते. या प्रकल्पात सध्या २४४.१९७ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यात उपयुक्त पाणीसाठा केवळ १४ टक्के आहे. त्यामुळे हे पाणी किती दिवस पुरेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. येलदरीबरोबरच करपरा आणि मासोळी हे दोन मध्यम प्रकल्प असून जिंतूर तालुक्यातील करपरा प्रकल्पामध्ये ११.२१८ दलघमी पाणीसाठा आहे. तर मासोळी प्रकल्प पूर्णत: कोरडा आहे. जिल्ह्यात ३२ लघुप्रकल्प असून या लघुप्रकल्पांमध्ये अवघे १५ टक्के पाणी शिल्लक आहे. झरीच्या तलावात ३७ टक्के पाणी असून हे पाणी मानवत शहराची पिण्याच्या पाण्याची गरज भागविणार आहे. निम्न दुधना प्रकल्पामध्ये ५० टक्के पाणी असून या प्रकल्पातून सेलू शहराचा पाणीपुरवठा योजना तसेच अन्य दोन-चार गावांच्या पाणीपुरवठा योजना चालणार आहेत. जिंतूर तालुक्यातील करपरा मध्यम प्रकल्पातील ४५ टक्के पाण्यावर परिसरातील गावांची भिस्त आहे. गोदावरी, पूर्णा, दूधना या नद्या परभणी जिल्ह्यातून प्रवाहित आहेत. या नद्यांमुळे देखील जिल्ह्याचा पाणीप्रश्न मोठय़ा प्रमाणात कमी होतो. परंतु मागील काही वर्षांपासून या नद्यांनाही पाणी राहिलेले नाही. दोन वर्षांत तर एकही नदी दुथडी भरून वाहिली नाही. परिणामी नदीकाठावरील गावांमध्ये देखील पाणीपातळी खोल गेली आहे. या गावांनाही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गंगाखेड तालुक्यातील मासोळी प्रकल्पासह गोदावरी नदीवर बांधलेले मुदगल, डिग्रस, ढालेगाव, मुळी हे चारही बंधारे कोरडे पडले आहेत. िपपळदरीचा तलावही कोरडाठाक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पात पाणी उपलब्ध नाही. ज्या प्रकल्पात पाणी आहे, त्या परिसरातील गावांचा एकदोन महिन्यांचा प्रश्न मिटणार आहे.