दारुपायी पती घरी यायचा नाही…अन् मद्यधूंद अवस्थेत घरी आल्यावर मारहाण करत असल्याने माहेरी जाण्याच्या तयारीत असलेल्या विवाहितेची पतीने गुरुवारी रात्री हत्या केली. जयाजी ओळेकर (वय ४५) असे या विवाहितेचे नाव असून हत्येनंतर तिचा पती जयाजी ओळेकर हा मोबाईल, फोटो अल्बम आणि घरातील रोखरकमेसह पसार झाला आहे.

जालना जिल्ह्यातील कमल ओळेकर यांचा २५ वर्षांपुर्वी जयाजीसोबत विवाह झाला. जयाजीला दारुचे व्यसन होते. लग्नानंतर त्याने स्वत:च्या नावे असलेली शेती कवडीमोल भावात विकली. जे पैसे आले त्याचीही त्याने उधळपट्टी केली. १५ वर्षांपुर्वी ओळेकर दोन मुले, मुलगी व पत्नी कमलसोबत सुलतानपुर गावात राहायला आला. जयाजीच्या व्यसनामुळे पत्नी कमल आणि मुले देखील कंटाळले. कमलने आई-वडिलांकडून आर्थिक मदत घेत मुलीचा विवाह केला. उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने ती स्वत: मोलमजूरी करु लागली. तर उपजिवीका भागवण्यासाठी मोठा मुलगा नगर जिल्ह्यातील सुपा येथील हॉटेलमध्ये कामाला लागला.  कमल व तिचा धाकटा मुलगा असे दोघे सुलतानपुरमधील भाड्याच्या घरात राहत होते.

गेल्या पंधरा दिवसांपासून जयाजी घरी परतला नाही. त्याच्या त्रासाला कंटाळलेल्या कमलने शुक्रवारी तळणीला माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. पण गुरुवारी रात्री जयाजी घरी आला. त्याने कमलला घरात का येऊ देत नाही, दारु का पिऊ देत नाही म्हणून तिचा गळा दाबून खुन केला. त्यानंतर घरातील पैसे, कमलचा मोबाईल आणि फोटो अल्बम घेऊन तो पसार झाला.

जयाजी नेहमी दारुच्या नशेत असायचा. त्यामुळे कमल त्याला घरात येऊ देत नव्हती. गुरुवारी त्याने कमल घरात येऊ देत नाही म्हणून तिच्या वडिलांना एकसारखे फोन केले. पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. म्हणून जयाजीने थेट घर गाठले. घरी गेल्यानंतर त्याने कमलशी वाद घातला. वाद मिटल्यावर कमल झोपी गेली. तेव्हा जयाजीने झोपेतच डाव्या बाजूने तिचा गळा दाबून खुन केला. त्यानंतर जयाजी पसार झाला. सकाळी साडेसातच्या सुमारास कमलचा मुलगा झोपेतून जागी झाला. कमल झोपेतून उठत नसल्याचे पाहून त्याने घरमालक महिलेला ती बेशुध्द असल्याचे सांगितले. घरमालक महिलेला गळा आवळल्याचा संशय आल्याने तिने पोलिस पाटलांना घटनेची माहिती दिली.

आठ दिवसांपुर्वी विकली दुचाकी…
दारुच्या व्यसनासह मौजमजा करण्यासाठी जयाजीने आठ दिवसांपुर्वी स्वत:ची दुचाकी नारेगावातील एकाला दहा हजार रुपयात विकली. हे पैसे देखील संपल्यामुळे तो कमलच्या वडिलांकडे पैशांची मागणी करत होता. पण त्यांनी जयाजीला पैसे देण्यास नकार दिला होता. त्यामुळे तो पैशासाठी कमलशी वाद घालत होता. दरम्यान, कमलच्या भावाच्या तक्रारीवरुन चिकलठाणा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.