05 April 2020

News Flash

नाथषष्ठीची यात्रा ‘करोना’च्या सावटामुळे रद्द

४०० वर्षांंची परंपरा असलेल्या पैठणमधील यात्रेचा यंदा प्रथमच वारकरी, व्यापाऱ्यांना उलटाच अनुभव येत आहे.

सुटी कायम, व्यापाऱ्यांना फटका

औरंगाबाद : पैठणमध्ये नाथषष्ठीनिमित्त दरवर्षी भरणारी यात्रा यंदा ‘करोना’च्या सावटाखाली प्रशासनाकडून रद्द करण्यात आली आहे. पण जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारातील सोमवारची उत्सवाची सुटी मात्र कायम ठेवण्यात आली आहे. धार्मिक ग्रंथ, लाह्य़ा, रेवडय़ा, कुंकु-बुक्का आदी साहित्य व्यापाऱ्यांनी यात्रेसाठी आणून ठेवले होते. आता त्याची विक्री होणार नाही म्हणून व्यावसायिक चिंतीत असून दिंडय़ांच्या माध्यमातून येणाऱ्या वारकऱ्यांनाही यंदा पाहुणचाराविनाच परतावे लागत आहे. ४०० वर्षांंची परंपरा असलेल्या पैठणमधील यात्रेचा यंदा प्रथमच वारकरी, व्यापाऱ्यांना उलटाच अनुभव येत आहे. ‘पाण्याला लागली तहान’ या कूट अभंगाची आठवण सांगून जाणारा.

करोनाचा फैलाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने गर्दी होणाऱ्या ठिकाणचे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.  १४ ते १६ मार्च या तीन दिवसांच्या कालावधीत नाथ षष्ठीचा पैठणमध्ये मोठा यात्रोत्सव भरणार होता. यंदाचा ४२१ वा नाथषष्ठीचा उत्सवी सोहळा आहे. दरवर्षीच्या यात्रेत सुमारे ५०० ते ६०० लहान-मोठय़ा दिंडय़ांच्या माध्यमातून सुमारे एक लाखांपेक्षा अधिकच्या संख्येने वारकरी दाखल होतात. या वारकऱ्यांना पैठणकरांकडून चहा-अल्पोपहार, महाप्रसादाच्या रुपाने अगत्याने पाहुणचार करण्यात येतो. तर वारकऱ्यांकडून एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांची गाथा, तुळशीमाळा, चंदन, बुक्का, कुंकू, अष्टगंध, गोधडी, लाह्य़ा, बत्तासे, फुटाणे, रेवडय़ा, मृदंग, तबला, टाळ, सतरंज्या, घोंगडी असे विविध प्रकारचे साहित्य यात्रेतून खरेदी केले जाते. आता हा मागवलेला माल कसा विकायचा, असा प्रश्न व्यावसायिकांना पडला आहे.

पैठणमधील नाथमंदिरालगतच १९५४ पासून प्रशांत मुंकर यांचे धार्मिक ग्रंथ विक्रीचे दुकान आहे. त्यांनीही यात्रेच्या पाश्र्वभूमीवर मोठय़ा संख्येने मागवलेल्या धार्मिक ग्रंथांचे काय करायचे, असा प्रश्न उभा राहिल्याचे सांगितले. प्रशांत मुंकर पुढे म्हणाले, ‘‘इतिहासात प्रथमच यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यात्रेसाठी म्हणून आमची अनेक दिवसांपासून धार्मिक ग्रंथांची खरेदी होत असते. आता आम्हाला खरेदी करून आणलेला माल विक्री करण्यासाठी यंदा ऑगस्ट-सप्टेंबपर्यंत वाट पहावी लागणार आहे. यंदा एक दिलासा तरी मिळाला आहे. अधिक मास (धोंडय़ाचा महिना) असल्यामुळे त्या कालावधीत धार्मिक ग्रंथांची खरेदी केली जाते.’’ तर मंदिराशेजारीच असलेले प्रसादाचे व्यापारी नितीन घाडगे म्हणाले, ‘‘९५ टक्के माल पडून राहणार आहे. वारकरी नसल्यामुळे प्रसादाची विक्री काहीच होणार नाही.’’

‘करोना’च्या पाश्र्वभूमीवर पैठणमध्ये दिंडय़ा तर दाखल होत आहेत. मात्र मंदिरात पाच-दहाच्या गटाने वारकरी दर्शनासाठी येत आहेत.  वारकऱ्यांमध्ये काही अफवाही ऐकण्यास येत आहेत. शहराबाहेरच वारकऱ्यांना मंदिर परिसरात शंभरावर जवान तैनात केल्याची अफवा कानावर येत आहे. त्यामुळे गटागटाने येऊन आणि पाहुणचार न घेताच केवळ नाथांच्या समाधीवर नतमस्तक होत वारकरी परतत आहेत. दरम्यान, प्रशासनाने पैठणमधील यात्रा रद्द केल्याच्या निर्णयावर नाराजीचाही सूर उमटत असून त्यासंदर्भात काही प्रश्नही उपस्थित करून ते समाजमाध्यमांवरून पाठवल्याचे दिसत आहे.

रांजण भरणाऱ्या महिलेचे स्वागत

नाथमंदिरातील प्रसिद्ध श्रीखंडय़ा रांजणाची शुक्रवारी विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. रांजण भरण्याच्या प्रक्रियेत शेवगाव तालुक्यातील वडुले गावच्या प्रिया विनायक चोपडा यांच्या हस्ते टाकलेल्या घागरीतील पाण्याने रांजण भरला. त्यानंतर उपस्थितांकडून श्रीखंडय़ा व एकनाथ महाराजांच्या नावाचा जयघोष झाला. प्रिया चोपडा यांचे नाथवंशीय कुटुंबातील महिलांच्या हस्ते खणा-नारळाने ओटी भरून स्वागत करण्यात आले.

यात्रा रद्द, पण दर्शनाची व्यवस्था

प्रशासनाकडून पैठणची यात्रा रद्द करण्यात आलेली असली तरी मंदिर देवस्थानकडून संत एकनाथांच्या समाधीचे दर्शन घेण्यास वारकऱ्यांना मनाई करण्यात आलेली नाही. आजही सुमारे ५० हजार वारकऱ्यांनी दर्शन घेतले असून उद्या एक लाख भाविक येतील, असा अंदाज आहे. वारकरी दिंडय़ा शहराबाहेर थांबवून दर्शनासाठी येत आहेत.

 – बाजीराव बारे,कार्यकारी विश्वस्त.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2020 2:53 am

Web Title: administration canceled annual nath shashthi yatra due to coronavirus zws 70
Next Stories
1 रावसाहेब दानवेंच्या मुलीविरोधात पोलिसांत तक्रार; शिवीगाळ, धमकी दिल्याचा आरोप
2 मनसे-शिवसेनेची शिवजयंती समोरासमोर
3 करोनाच्या नियंत्रणासाठी ‘घाटी’तील आरोग्ययंत्रणा तकलादू
Just Now!
X