औरंगाबाद : जगभर निर्यात होणारी शेकडो प्रकारची उत्पादने, तंत्रज्ञानात झालेली प्रगती, अनेक अनोखे प्रयोग आणि अभिमान वाटावी अशी मराठवाडय़ातील उद्योगशक्तीचे प्रदर्शन मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर (मसिआ)  यांच्या वतीने ९  ते १२ जानेवारीदरम्यान चिकलठाणा औद्योगिक परिसरातील कलाग्राम आणि गरवारे स्टेडियम येथे होणार आहे. ‘अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२०’ या औद्योगिक प्रदर्शनाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. धुळमुक्त व्यवस्था असलेल्या या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रदर्शनात मराठवाडय़ाबरोबरच राज्य आणि परराज्यातील उद्योग उत्पादने प्रदर्शित करणार आहे.

कलाग्राम आणि जवळच्या भव्य मदानावर साडेचारशेपेक्षा अधिक दालने उभारण्यात आले असून, बहुतांश दालनांची नोंदणीही पूर्ण झालेली आहे. मैदानावर स्वतंत्र पॅव्हेलियन, सभागृह, प्रशासकीय कक्ष, पत्रकार कक्ष, स्वागत कक्ष, कॅफेटेरिया आदी असणार आहे. संपूर्ण परिसर मॅटिंगने आच्छादला जाणार असल्याने धुळीचा त्रास जाणवणार नाही. प्रदर्शन आणि संपूर्ण परिसर सुशोभित करण्यात येत असून, प्रदर्शन पाहण्यास येणारांकरिता फिरण्यासाठी भरपूर मोकळी जागा ठेवण्यात आली आहे.

या प्रदर्शनाच्या आयोजनात महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि औरंगाबाद महानगरपालिका यांचे मोलाचे सहकार्य लाभलेले आहे. प्रदर्शनासाठी केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय (एमएसएमई), राष्ट्रीय लघुउद्योग निगम (एनएसआयसी) आणि राज्य शासनाचा उद्योग विभाग यांचेही सहकार्य लाभले आहे, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली. शेंद्रा औद्योगिक परिसर ते बिडकीनदरम्यान साकारत असलेली औद्योगिक नगरी, स्मार्ट सिटी औरंगाबादला साजेसा होत असलेला सर्वच क्षेत्रातील नेत्रदीपक विकास, येथील भूमिपुत्रांनी अथक प्रयत्नांनी उद्योग क्षेत्रात मिळविलेला नावलौकिक आणि जागतिक पातळीवर आपल्या कर्तृत्वाचा उमटविलेला ठसा हे सारे या प्रदर्शनाच्या माध्यमातून देश-विदेशातून या प्रदर्शनाला भेट देणारया उद्योजकांसमोर सादर होणार आहे. येथील  उद्योगांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून विकासाची खूप मोठी संधीच प्राप्त होणार आहे, असे आयोजकांनी कळवले आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी दहा ते सायंकाळी सात अशी ठेवण्यात आली आहे. या प्रदर्शनाला उद्योजक, व्यापारी, शेतकरी, उद्योग सुरु करू इच्छिणारे यांच्याच बरोबर अभियांत्रिकी, एमबीए आदी अभ्यासक्रमातील विद्यार्थी, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, सर्वसामान्य नागरिक आदी सर्वानीच भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे. प्रदर्शन यशस्वीतेकरिता मसिआचे अध्यक्ष ज्ञानदेव राजळे, प्रदर्शन समन्वयक सुनील कीर्दक, उपाध्यक्ष नारायण पवार आणि अभय हंचनाळ, सचिव अर्जुन गायकवाड, मनीष अग्रवाल, कोषाध्यक्ष राजेंद्र चौधरी आणि विकास पाटील, प्रसिद्धिप्रमुख अब्दुल शेख आणि भगवान राऊत यांच्यासह मासिआचे सर्व पदाधिकारी, सदस्य, आयोजन समिती सदस्य प्रयत्नशील आहेत.

या औद्योगिक प्रदर्शनामध्ये ऑटो कॉम्पोनंट्स, प्रेसिजन टूल्स, ऑटोमेशन अ‍ॅण्ड एनर्जी, मशीन टूल्स, फूड प्रोसेसिंग आदी क्षेत्रातील प्रथितयश उद्योग, कंपनी ट्रेिडग करणाऱ्या संस्था, तंत्रज्ञानविषयक शैक्षणिक संस्था, बँका यासह उद्योगांना सेवा पुरविणाऱ्या संस्था सहभागी होणार आहेत.