News Flash

‘महाज्योती’ शिष्यवृत्तीची जाहिरात अखेर प्रसिद्ध

महाज्योतीच्या संकेतस्थळावर ९ एप्रिल रोजी दुपारनंतर शिष्यवृत्ती मिळण्याच्या संदर्भाने जाहिरात प्रसिद्ध झाल्याचे दिसत आहे.

औरंगाबाद : महात्मा जोतिबा फुले संशाधन आणि प्रशिक्षण संस्थेअंतर्गत (महाज्योती) आचार्य (पीएच.डी.) पदवी मिळवणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना प्रतीक्षा असलेली शिष्यवृत्ती (फेलोशिप) मिळण्याच्या संदर्भातील जाहिरात ‘महाज्योती’कडून संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या संदर्भातील वृत्त ‘लोकसत्ता’च्या ६ एप्रिलच्या अंकात प्रकाशित झाले होते.

महाज्योतीच्या संकेतस्थळावर ९ एप्रिल रोजी दुपारनंतर शिष्यवृत्ती मिळण्याच्या संदर्भाने जाहिरात प्रसिद्ध झाल्याचे दिसत आहे. जाहिरातीनुसार महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती (एमजेपीआरएफ) योजनेंतर्गत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत असून ते १२ एप्रिल ते १२ मे २०२१ या कालावधीत भरावयाचे आहेत. महाज्योतीअंतर्गत पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना सारथी, बार्टीच्या धर्तीवर शिष्यवृत्ती देण्याचा ठराव मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे ७ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी मंत्री वडेट्टीवार यांनी ट्विट करून २०० संशोधक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्याची घोषणा करून लवकरच जाहिरात काढण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतर तीन महिने उलटून गेले तरी शिष्यवृत्ती देण्याबाबत पुढे काहीच हालचाल होत नव्हती.

पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी इतर सुरू असलेले काम, नोकरी सोडून द्यावी लागते. महाज्योतीअंतर्गत पीएच.डी, करणारे बहुतांश विद्यार्थी शेतकरी, ऊसतोड मजुरांची मुले आहेत. त्यांनी हातचे काम, नोकरी सोडल्यामुळे त्यांची कुचंबणा होत आहे. महाज्योतीच्या कार्यालयाकडूनही विद्यार्थ्यांना कुठलाही प्रतिसाद देण्यात येत नव्हता. या संदर्भातील वृत्त लोकसत्तात ६ एप्रिलच्या अंकात प्रकाशित झाले होते.

महाज्योतीकडून शिष्यवृत्तीची जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या संदर्भातील घोषणा होऊनही पुढे काहीच होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. मात्र, आता जाहिरात प्रकाशित केल्याने त्याचा लाभ गरीब, शेतकरी पाश्र्वाभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना होणार आहे. त्याचा आनंद आहे.

– डॉ. रोहित चव्हाण, राज्य अध्यक्ष, अ‍ॅग्रिकल्चर डॉक्टोरेट्स असोसिएशन.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2021 12:45 am

Web Title: advertisement of mahajyoti scholarship is finally famous akp 94
Next Stories
1 तहसीलदारांनी मागितली १,२५,००० हजारांची लाच; रंगेहाथ अटक
2 मराठवाडय़ात ७४.२६ टक्के लसीकरण पूर्ण
3 सोयाबीन बियाणे क्विंटलमागे १० हजार रुपयांवर!
Just Now!
X