औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मराठवाडय़ातील दुष्काळी पाहणीसाठी आल्यानंतर अन्य पक्षांच्या नेत्यांनीही दुष्काळ पाहणी दौरे सुरू केले आहेत. काँग्रेसने मराठवाडय़ातील दुष्काळ पाहणीसाठी आमदार बसवराज पाटील यांची नियुक्ती केली असून ते बुधवारी पैठण तालुक्यातील आडुळ, बालानगर, सोलनापूर या भागाचा दौरा करणार असून जालना, औरंगाबाद आणि बीड जिल्ह्य़ातील पाहणीनंतर ते त्यांचा अहवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना देणार आहेत. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराडही आता दुष्काळी दौऱ्यावर आहेत.

लोकसभेच्या निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत शरद पवार यांनी बीड जिल्ह्य़ात दुष्काळ दौरा केला. शेतकरी व गावातील टंचाईच्या परिस्थितीचा आढावा घेतला. मराठवाडय़ातील दुष्काळ उपाययोजनांबाबत सरकार दुर्लक्ष करीत आहे, असे विधानही त्यांनी केले. एका बाजूला विरोधक प्रत्यक्ष गावागावांत जाऊन पाहणी करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सरपंचांशी संवाद साधला आहे. पुढील आठवडय़ात १९ मे रोजी ते मराठवाडय़ात येतील, असे सूत्रांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी  प्रमुख नेते मराठवाडय़ातील दुष्काळ पाहणी करण्यासाठी येत आहेत. दरम्यान, नेत्यांच्या भेटी सुरू असताना तक्रारी आणि आंदोलनेही आखले जात आहेत. जायकवाडीतील पाणी पिण्यासाठी सोडावे, अशी मागणी रेटली जात असली तरी जायकवाडीतील पाणीसाठा जुलैअखेपर्यंत वापरता यावा म्हणून पाणी सोडावे की नाही यावरून प्रशासनात संभ्रम आहे. पाणी सोडले तर ते शेवटच्या टोकापर्यंत जाणार नाही. त्यामुळे पाणी सोडूनही नाराजी वाढण्याची शक्यता आहे. ज्या भागातून पाण्याची मागणी होते, त्या भागात पिण्यासाठी पाणी लागणार नाही तर ते पाणी सिंचनासाठी वापरले जाईल आणि तो सध्या प्राधान्यक्रम नाही, असे अधिकारी सांगत आहेत. पावसाचा अंदाज पाहून जायकवाडीतून पाणी सोडायचे की नाही याबाबतचे निर्णय होतील, असे मंगळवारी सांगण्यात आले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी दुष्काळ दौऱ्याच्या निमित्ताने मतदानाचाही अंदाज नेते घेत आहेत.