‘आवाज कोणाचा’ अशी दमदार घोषणा देणारा आक्रमक पक्ष अशी शिवसेनेची ओळख येत्या काळात बदलेल, असे संकेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यात दिसून आले. ‘योजना अडवा योजना जिरवा’ हे सरकारी स्वरूप बदलता यावे, म्हणून शिवसेनेच्या वतीने योजनांवर देखरेखीसाठी कार्यकर्त्यांची पथके नेमण्याची गरज असल्याचे मत ठाकरे यांनी व्यक्त केले. पहिल्यांदाच सिंचनक्षेत्रात शिवजलक्रांती नावाने उडी घेणाऱ्या शिवसेनेचा या क्षेत्रातील आराखडा कसा असावा, या विषयीची चर्चा त्यांनी येथील ‘दिलासा’ या स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांसोबत केली.
‘टीका करण्याचा हा काळ नाही. संकटातून बाहेर पडले पाहिजे. मात्र, त्यासाठी पाणी आवश्यक आहे आणि ते तयार करण्याचे तंत्र अजून काही विकसित झाले नाही. येत्या काळात या साठी काम करावे लागेल. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी उभारावी लागेल आणि मानसिक आधार देताना तातडीच्या उपाययोजना म्हणून पाण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे त्यांनी सांगितले. कृषी विस्तार सेवेत शिवसैनिकांना काम देता येऊ शकेल आणि शिवसेनेच्या शाखांचीही पुनर्बाधणी करता येऊ शकेल, अशी रचना उभारण्याची तयारी शिवसेनेकडून हाती घेतली जाण्याची शक्यता आहे. येत्या काळात शिवसेनेची मदत केंद्रेही उभारली जातील. ‘शिवसेनेच्या काही शाखांमध्ये आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत आहोत. अशीच व्यवस्था शेतकऱ्यांनाही उपलब्ध करून देता येईल का हे तपासू. पण या सगळ्या दीर्घकालीन उपाययोजना आहेत. तातडीची उपाययोजना म्हणून टँकरच्या गढूळ पाण्याला फिल्टर कसे लावता येईल हे पाहण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. ‘कर्जमाफी, व्याजमाफी’ यांसह विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी आता स्वतंत्र पथके उभारण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
उस्मानाबाद जिल्ह्य़ात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आयोजित कार्यक्रमाला खराब हवामानाचे कारण देत जाण्याचे टाळून उद्धव ठाकरे साडेचार वाजता विशेष विमानाने औरंगाबादेत दाखल झाले. ते शासकीय विश्रामगृहात थांबणार होते. मात्र, नंतर त्यांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये उतरणे पसंत केले. त्यानंतर शेती आणि पाणीप्रश्नांवर विविध व्यक्तींच्या भेटी घेतल्या. नंतर ‘दिलासा’ या संस्थेच्या कार्यालयास त्यांनी भेट दिली. या वेळी प्रा. अनघा पाटील व संजीव उन्हाळे यांनी सादरीकरण केले. उद्या (शनिवारी) फुलंब्री व खुलताबाद येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मदतीचे वाटप केले जाणार आहे.