मराठवाडय़ातील दुष्काळास राष्ट्रवादी काँग्रेसच जबाबदार असल्याचा सुरू असणारा आरोप एका बाजूला, तर दुसरीकडे सिंचन घोटाळ्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळालेले समन्स अशा वातावरणात पक्षाने सोमवारी मराठवाडय़ात पुकारलेल्या जेलभरो आंदोलनास चांगला प्रतिसाद मिळाला. खासदार सुप्रिया सुळे यांनी जालना जिल्ह्य़ात सहभाग नोंदवत अटक करवून घेतली. औरंगाबाद तालुक्यातील करमाड येथे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलनात तटकरे, अजित पवार सहभागी झाले नाहीत.
दुष्काळी भागातील विविध मागण्यांबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आरोपांना उत्तर देण्याचे टाळले. औरंगाबाद तालुक्यातील आंदोलनात वळसे पाटील यांनी शरद पवार यांनी गेल्या ४० वर्षांत काय केले, हे विचारण्याचे हे व्यासपीठ नव्हे. त्याची स्वतंत्र चर्चा करण्याची तयारी असल्याचे सांगितले, तर उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेत डॉ. पद्मसिंह पाटील यांनी अजित पवार व सुनील तटकरे निर्दोष असल्याचा दावा केला.
खासदार सुळे यांनी वडिगोद्री (तालुका अंबड) येथे झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व केले. या वेळी कार्यकर्ते मोठय़ा प्रमाणात सहभागी झाले होते. पाणी, चारा समस्येकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सर्वत्र करण्यात आला. दुष्काळग्रस्तांना मदत देण्यास उशीर होत असल्याची भावना असल्याने आंदोलनास औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, उस्मानाबाद, हिंगोली, तसेच लातूरमधील उदगीर व अहमदपूर येथे चांगला प्रतिसाद मिळाला. पक्षवाढीसाठी दुष्काळाचा राष्ट्रवादी उपयोग करून घेत असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला होता. या पाश्र्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी दानवे यांच्यावर टीका केली. औरंगाबाद शहरात दानवे यांच्या कार्यालयासमोरही कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.