26 February 2020

News Flash

ऊसतोडणी मजुरांचे कोयता बंद आंदोलन चिघळले

ऊसतोडणी मजुरीत २० टक्के दरवाढ करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतरिम घोषणा करूनही साखर संघाने दिली नाही.

ऊसतोडणी मजुरीत २० टक्के दरवाढ करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतरिम घोषणा करूनही साखर संघाने दिली नाही. सरकारने ऊसतोडणी मजुरांची फसवणूक केल्यामुळे या वर्षी गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी मजूर संघटनांनी कोयता बंद आंदोलनाचा इशारा देऊन सोमवारपासून जिल्ह्यात मजूर घेऊन जाणाऱ्या गाडय़ा अडवून धरण्यास सुरुवात केल्याने आंदोलन चिघळले आहे. परळी व तेलगावमध्ये मजूर घेऊन जाणाऱ्या गाडय़ा फोडण्यात आल्या, तर भोगलवाडी, गावदऱ्यात जवळपास २५ गाडय़ा अडवून मजुरांचे सामान खाली उतरविण्यात आले. त्यामुळे ऊसतोडणी कामगारांच्या पट्टय़ात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बीड जिल्ह्यातून दरवर्षी ऊसतोडणीसाठी राज्यभरातील साखर कारखान्यांवर जवळपास ५ लाख मजूर जातात. ऊसतोडणी मजूर, मुकादम व वाहतूकदारांचे संघटनही मजबूत आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी अनेक वर्षे या मजुरांच्या संघटनेचे नेतृत्व केले. मागील वर्षी साखर संघाबरोबर संपलेला करार नव्याने करून दरवाढ व कमिशन वाढ करावी, अशी मागणी करीत संघटनांनी संप पुकारला होता. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या मध्यस्थीने २० टक्के अंतरिम वाढ देण्याची घोषणा करून संप मागे घेण्यात आला होता. गळीत हंगाम संपला, तरी सरकारच्या घोषणेची अंमलबजावणी झाली नाही व नव्यानेही करार झाला नाही. त्यामुळे मागील आठवडय़ात गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी मजूर, मुकादम व वाहतूकदार संघटनेची व्यापक बठक होऊन भाववाढ होत नाही तोपर्यंत कोयता बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. संघटनेच्या इशाऱ्याकडे सरकारने दुर्लक्ष केल्यानंतर सोमवारपासून संघटनेने मजूर घेऊन जाणाऱ्या गाडय़ा अडवण्यास सुरुवात केली आहे.
कर्नाटकसह राज्यभरातील विविध कारखान्यांच्या मालमोटारी मोठय़ा संख्येने ऊसतोडणी कामगारांच्या गावात दाखल झाल्या आहेत. सोमवारी सकाळी भोगलवाडी येथे जवळपास २० मालमोटारींमध्ये मजूर सामान भरून जाण्याच्या तयारीत असतानाच संघटनेच्या लोकांनी गाडय़ा अडवून मजुरांचे सामान खाली उतरवले. गावदऱ्यातही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी १० वाहने अडवून मजुरांना रोखून धरले. परळीत मजूर घेऊन जाणाऱ्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी कृष्णा तिडकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तेलगाव येथेही दुपारी मजूर घेऊन जाणाऱ्या टेम्पोच्या काचा फोडण्यात आला.
ऊसतोडणी कामगारांचा पट्टा असलेल्या धारुर, वडवणी परिसरात हजारो मजुरांना रोखण्यात येत असल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. ऊसतोडणी मजुरांच्या संघटनांनी गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर साखर संघाच्या लवादात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना नेता म्हणून घेण्याची मागणी केली असली, तरी कोणताच निर्णय होत नसल्याने ऊसतोडणी मजूर संघटनांनी पंकजा मुंडे यांच्या परळीतून आंदोलनाला सुरुवात केली आहे. आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे श्रीमंत जायभाय, संजय तिडके, गोरख रसाळ आदी करीत आहेत.
‘सरकारच्या फसवणुकीविरुद्ध संताप’
मागील वर्षी २० टक्के अंतरिम दरवाढ देण्याची घोषणा करून भाजप सरकारने संप मागे घेण्यास लावला. मात्र, वर्ष लोटले तरी घोषणेची पूर्तता नाही आणि नवीन करारही होत नसल्याने सरकारच्या फसवणुकीविरुद्ध ऊसतोडणी मजूर, मुकादमातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याचीच परिणिती कोयता बंद आंदोलनात झाली आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय या वेळी संप मागे न घेण्याची भूमिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली असल्याचे संघटनेचे प्रदेश प्रवक्ते बालाजी तोंडे यांनी स्पष्ट केले.

First Published on October 13, 2015 1:40 am

Web Title: agitation of sugarcane cutter worker
Next Stories
1 ऑनलाईन फार्मसीच्या विरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी बंद
2 शंकरराव चव्हाण पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण
3 नवरात्रीच्या पूर्वसंध्येला मंदिर रोषणाईने उजळले
Just Now!
X