गारपीटग्रस्त मराठवाडय़ातील शेतकऱ्यांचा सवाल

मराठवाडा कृषी समस्येने ग्रासलेला. आत्महत्यांचा आकडा ९९१. बोंडअळीने बाधित क्षेत्र १० लाख ४८ हजार ५३८ हेक्टर एवढे. अशा विपरीत परिस्थितीमध्ये जीवनमरणाची लढाई करत शेतीत राबणारा मराठवाडय़ातील माणूस प्रश्न विचारत आहे, ‘कोठे आहेत कृषिमंत्री?’   राजशिष्टाचार विभागातील फुंडकरांचा दौरा दैनंदिनीमध्ये त्यांना विवाह समारंभात हजेरी लावणे, देवदर्शन घेणे यातच अधिक रस असल्याच्या नोंदी आहेत. परभणी कृषी विद्यापीठातील एका कार्यशाळेला उपस्थित राहण्यापलीकडे फुंडकर औरंगाबादला आले आणि त्यांच्या मूळ गावी खामगावला गेले, अशाच नोंदी आहेत. या अनुषंगाने त्यांना विचारले असता ‘ मी कृषी विभागाच्या आढावा बैठका घेतल्या आहेत.’ एवढेच ते म्हणाले.

भाजपतील अंतर्गत लाथाळय़ा आणि जमीन प्रकरणात एकनाथ खडसे यांना पायउतार व्हावे लागल्यानंतर कृषिमंत्रिपदाचा कार्यभार पांडुरंग फुंडकर यांच्याकडे देण्यात आला. खडसे मंत्री असताना ते नेहमी अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यासाठी येत असत. नंतर बैठकीतही कृषिमंत्री दिसेनासे झाले. फुंडकर यांनी पदभार घेतल्यानंतर ते ११ जुलै रोजी मराठवाडय़ात आले. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मतदारसंघातील राजूरच्या गणपती दर्शनासाठी गेले. तेव्हा त्यांनी एका विवाहसोहळय़ासही हजेरी लावली. त्यांचा पुढचा दौरा शनिशिंगणापूरचा. औरंगाबादला विमानतळावर आले. मग पुढे मुंबईला गेले. कडवंची येथील पाणलोटाची कामे पाहिल्याची १६ सप्टेंबरची एक नोंद तेवढी त्यांच्या खात्यावर दौरा म्हणून नोंदवण्यासारखी आहे. पुढे औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळावरून ते आळंदीला गेल्याची नोंदही आहे. फुंडकर यांचे मूळ गाव खामगाव. तेथून हवाई मार्गे कोठे जायचे असेल तर त्यांना औरंगाबाद जवळ  पडते. मग शासकीय दौऱ्याची माहिती राजशिष्टाचार विभागाला दिली जाते. त्यांच्या व्यवस्थेसाठी संपर्क अधिकारी नेमले जातात. अजिंठा- सिल्लोड मार्गे ते सिंदखेडराजा  येथे जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त कार्यक्रमाला गेले.  मग प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलाचा विवाहसोहळा झाला तेव्हा ते आले होते. या काळात शेतीमध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या.  या अभावग्रस्त शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी ‘नाम’सारख्या स्वयंसेवी संस्था पुढे आल्या. पण अश्रू पुसण्यासाठी सरकारचा प्रतिनिधी म्हणून फुंडकर काही फिरकले नाहीत. बोंडअळीचा प्रादुर्भाव जाणवू लागला, तेव्हा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दौरा केला. शेतकऱ्यांच्या शिवारात जाऊन भेटी घेतल्या. पण फुंडकर काही फारसे मराठवाडय़ात फिरकले नाहीत. तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी मात्र त्यांनी हजेरी लावली तेव्हा कर्जमाफीचा विषय सुरू होता. परभणी व राहुरी येथील कृषी विद्यापीठाच्या कार्यशाळांना मात्र त्यांनी हजेरी लावली होती. ते तसे जाहीर कार्यक्रम होते. एरवी त्यांच्या दौऱ्यात देवदर्शनाचा सुकाळ असल्याचे दिसून येते. खामगावहून औरंगाबाद विमानतळावर यायचे आणि खास विमानाने निघून जायचे. या काळात अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवर काही चर्चा होत असे, असे सांगण्यात येते. मात्र, समस्येत सापडलेल्या मराठवाडय़ातील शेतकऱ्यांना भेटण्यासाठी फुंडकर आले होते, असे एकदाही घडले नाही. हे चित्र सातत्याने दिसत असल्याने काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी कृषिमंत्री दाखवा आणि २५ हजार रुपये मिळवा, अशी घोषणाही एका पत्रकार बैठकीत केली होती. पण त्यानंतरही फुंडकर दिसले नाहीत. ६ डिसेंबर रोजी खामगावहून मुंबईला ते गेल्याचा दौरा राजशिष्टाचार विभागाकडे उपलब्ध आहे. शेतकरी आत्महत्या, दुसरीकडे बोंडअळीमुळे झालेले नुकसान आणि आता नवे गारपिटीचे संकट, पण शाब्दिक दिलासा द्यायलाही हे सरकार तयार नाही, असे चित्रही दिसून येत आहे.

कोठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असा प्रश्न विचारला जात होता. आता तोच प्रश्न आहे. कोठे आहेत कृषिमंत्री? हजारो शेतकरी आत्महत्या करीत आहेत. ते येतील की नाही माहीत नाही. पण परभणी, बीड व जालना या तिन्ही जिल्हय़ांत शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जाणार आहे.

अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, कॉंग्रेस