मांजरा धरणात पाणीसाठा नसल्यामुळे कळंब शहराचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. असे असले तरी नगर परिषद प्रशासनाने पाण्याचे नियोजन करण्यास सुरुवात केली असून, ठिकठिकाणी प्रथमच २० फूट उंचावरून जलवाहिनी उभारून पाणीपुरवठा सुरू केला आहे. साधारण एक किलोमीटर अंतरावर ही वाहिनी उभारून शहराला हा पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाळय़ातही शहरातील लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
मागील ३ वर्षांपासून जिल्हय़ात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. परिणामी, मांजरा प्रकल्पात पाणीसाठा झाला नाही. सध्या या प्रकल्पात मृतसाठय़ाइतपत पाणी आहे. हे पाणी काही दिवस पुरणार असल्यामुळे आगामी काळात कळंब शहराला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. या पाश्र्वभूमीवर पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. शहरात विविध स्रोतांचा वापर करण्यात येणार आहे. यातून प्रतिदिन ६ लाख लीटरपेक्षा जास्त पाणी मिळणार आहे. यासाठी विविध ठिकाणी पाण्याच्या टाक्या व उपवाहिन्या करण्याचे काम चालू आहे. पाणीपुरवठा सभापती शिवाजी कापसे शहरातील पाणी नियोजनाकडे विशेष लक्ष देत असून, कर्मचारीही युद्धपातळीवर काम करीत आहेत.
शहरात ज्या ठिकाणी पाणीटंचाई जाणण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी नगरपरिषद प्रशासन सबलाइन करणार आहे. सध्या बाबानगर, दत्तनगर, इंदिरानगर येथे सबलाइन बसवण्याचे काम चालू आहे. कळंब नगरपरिषदेच्या एकूण बारा कूपनलिका आहेत. त्या ठिकाणी सिंटेक्स टाक्या बसवून पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच शहरात बऱ्याच ठिकाणी रस्ता न खोदता तथा वाहतुकीला अडथळा न आणता प्रथमच अशाप्रकारे वाहिनी केली.
सध्या सर्वच लघु-मध्यम, छोटे-मोठे प्रकल्प कोरडेठाक पडले असल्यामुळे उन्हाळय़ात तीव्र पाणीटंचाई सर्वत्र भासणार आहे. त्यासाठी प्रशासन लाखो रुपये खर्च करून पाणीचे नियोजन करीत आहे. कळंब शहरात काही दानशूर व्यक्तींनी आपल्या खासगी कूपनलिका शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नगर परिषदेच्या नि:शुल्क ताब्यात दिल्यामुळे प्रशासन त्या त्या ठिकाणी हवाई वाहिनी करून वेळ आणि पशाची बचत करून लोकांची तहान भागवत आहेत.
कळंब शहरातील नागरिकांना आतापर्यंत कधीच पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली नाही आणि येऊ नये, यासाठी पालिकेमार्फत हवे ते सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. शहरवासीयांनी टंचाई स्थिती लक्षात घेऊन पाणीबचत करून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा सभापती शिवाजी कापसे यांनी केले आहे.