जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील दस्तनोंदणी कार्यालयात एका दलालाने रात्री आठच्या सुमारास कर्मचाऱ्यास धक्काबुक्की करून खिडकीच्या काचा तोडल्या. या घटनेमुळे कर्मचारी हवालदिल झाले असून त्यांनी हल्लेखोरास अटक करावी, अशी मागणी केली. बुधवारी दिवसभर कार्यालयाचे कामकाज ठप्प होते.
दुष्काळामुळे दस्तनोंदणी कार्यालयातील व्यवहारास अधिक फटका बसला आहे, मात्र काही महत्त्वाच्या नोंदी घ्यावयाच्या बाकी असल्याने कार्यालयीन वेळेनंतरही दस्तनोंदणीचे काम सुरू होते. दलालामार्फत खरेदीखत नोंदणीसाठी कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला जातो. मंगळवारी रात्री कामकाजातून घरी जाण्याच्या तयारीत असताना दलाल नरेश सोळंके यांनी कर्मचाऱ्यास मारहाण केली व पाच क्रमांकाच्या खिडकीची काचही फोडली. ज्या हाताने त्याने काच फोडली, त्या जखमी हातानेच त्याने कर्मचाऱ्यास धक्काबुक्की केली. या अनुषंगाने सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनाही निवेदन देण्यात आले असून हल्लेखोरास अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधक जी. एस. कोळेकर यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.