पंकजा मुंडेंनी दोघांनाही फटकारले

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवारांचे राजकीय वलय पाहून १२ डिसेंबरला आपला वाढदिवस केला, असे धनंजय मुंडे यांनीच सांगितले. मुंडेंबरोबर मतभेद झाल्यानंतर बंधू पंडितराव व पुतणे धनंजय यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी भेट घेतली. पण आम्हीच त्यांना दीड वर्ष थांबवले होते, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनीच दिले. त्यामुळे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनीच भगवानगडावर नाते तोडल्याचे जाहीर केल्यानंतर आम्ही पक्षांतर केल्याचा दावा करणारे धनंजय मुंडे तोंडघशी पडले आहेत. तर अजित पवार यांनीही दिवंगत मुंडे यांच्या जन्मतारखेचा व कथित काँग्रेस प्रवेशाबाबत जाहीर वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे.

महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुलाखतीमधून दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यांनी राजकीय वादंग उठले आहे. धनंजय मुंडे यांनी सुरुवातीला दिवंगत काका गोपीनाथ मुंडे यांनीच परळी नगराध्यक्षपदाच्या निवडीत मतभेद झाल्यानंतर थेट भगवानगडावरील दसरा मेळाव्यात आमच्याशी रक्ताचे नाते तोडल्याचे जाहीर केले. त्यानंतर काही दिवसांनी आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला असे सांगितले. यावर अजित पवार यांनी मात्र मुंडे कुटुंबात मतभेद झाल्यानंतर पंडितराव व धनंजय मुंडे यांनी आमची भेट घेऊन पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा मीच घरात काही घटना घडत असतात, तुम्ही त्यांना सोडू नका, तिथेच रहा. असा सल्ला देऊन दीड वर्ष त्यांना थांबवले. पण त्यानंतर तुम्ही घेणार नसाल तर आम्ही इतर पक्षात जाऊ. आता भाजपमध्ये राहणे शक्य नाही, असे स्पष्ट सांगितले. तेव्हा तरुण कार्यकर्ता आहे म्हणून आम्ही त्यांना पक्षात घेतले, असे स्पष्टीकरण अजित पवारांनी दिले. त्यामुळे पवारांच्या स्पष्टीकरणाने धनंजय मुंडेंना तोंडघशी पडावे लागले.

शरद पवार यांचे वलय बघूनच दिवंगत मुंडे यांनी १९८० च्या दरम्यान आपला वाढदिवस पवारांच्या वाढदिवसाच्या दिवशीच १२ डिसेंबरला साजरा करणे सुरू केल्याचे धनंजय यांनीच सांगितल्याचे पवारांनी जाहीरपणे सांगून टाकले. तर भाजप अंतर्गत मतभेदानंतर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता. मुलगी पंकजा, पाशा पटेल, माधुरी मिसाळ, प्रकाश शेंडगे असे चार-पाच आमदारही पक्ष सोडणार होते. पण लोकसभेत मुंडे पक्षाचे उपनेते होते. त्यामुळे अशा प्रकारे पक्ष फोडायचा नसतो, असे मत व्यक्त करत तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीच त्यांना पक्षात घेतले नाही, असा गौप्यस्फोटही पवारांनी जाहीरपणे केला. पवार-मुंडेंच्या वक्तव्यावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त करत हयात नसलेल्या व्यक्तीबद्दल टीका टिप्पणी करून राजकारण तापवण्याचा किळसवाणा प्रकार सुरू असल्याचे सांगून अजित पवारांनीच धनंजय मुंडे यांचा खरा चेहरा उघड केल्याची टिप्पणी केली. दिवंगत मुंडेंचे आई-वडील अशिक्षित होते. त्यामुळे शाळेत दिलेली तारीख हीच जन्मतारीख असेलही. दिवंगत मुंडे यांचे नेतृत्व जयप्रकाश नारायण, गोळवलकर गुरुजी, डॉ. हेडगेवार यांच्या विचारांनी प्रेरित होऊन घडले. अटलजींच्या नेतृत्वाखाली जनसंघ आणि भाजपमध्ये त्यांनी काम केले. तेव्हा त्यांना जन्मतारीख ठरवायची असती तर अटलबिहारी वाजपेयी यांची २५ डिसेंबर हीसुद्धा ठरवता आली असती. तेव्हा अटलबिहारी वाजपेयी हे प्रभावी होते. मी शरद पवारांबरोबर एका व्यासपीठावर आल्यानंतर त्यांचा आदर करते. त्यांना पद्मविभूषण मिळाल्यानंतर अभिनंदन केले. हे माझ्यावरचे संस्कार आहेत. मात्र दुर्दैवाने राष्ट्रवादीचे लोक दिवंगत मुंडे यांच्याबाबत हयात नसताना खालच्या पातळीवर जाऊन बोलत आहेत. हा त्यांच्या संस्कृतीतील व संस्कारातील फरक असावा, अशा शब्दांत त्यांनी दोन्ही नेत्यांना फटकारले.

मुंडे समर्थकांचा संताप

समाज माध्यमातून दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी १९७२ साली पुणे येथे विधी महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षांत प्रवेशासाठी दाखल केलेल्या अर्जाची प्रतही प्रसारित करण्यात आली असून यात जन्मतारीख ही १२ डिसेंबर १९४९ नोंद आहे. यावरुन अजित पवारांनी जन्मतारखेबाबत निर्माण केलेला वादावर मुंडे समर्थकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.