अजित पवार यांची शिवसेनेवर टीका

औरंगाबाद : आतापर्यंत औरंगाबादच्या खासदारांनी काय काम केले? समांतर जलवाहिनीमध्ये गुत्तेदारी कोणी करायची? टेंडरमध्ये कोणी तोडपाणी करायची म्हणून औरंगाबादकरांना पाणी दिले जात नाही. शहरातील कचऱ्याचा प्रश्न जशाच्या तसा आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. वैजापूर येथे निर्धार परिवर्तन यात्रेत ते बोलत होते. परिवर्तन यात्रेत सहभागी नेत्यांनी भाजपबरोबर शिवसेनेलाही टीकेचे लक्ष्य केल्याचे दिसून आले. सरकार विरोधातील बहुतांश सभांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून यापूर्वी फक्त भाजपावरच टीका केली जात असे. लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारीच्या हालचालीला सुरुवात झाला आणि शिवसेनेलाही टीकेचे लक्ष्य करण्यात आले. परिवर्तन यात्रेत धनंजय मुंडे, वैजापूरचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर या नेत्यांनीही शिवसेनेचा विरोधाचा सूर अधिक उंच लावला होता.

औरंगाबाद लोकसभेची जागा काँग्रेसकडे असली, तरी ती राष्ट्रवादीला मिळावी असे प्रयत्न आघाडीच्या स्तरावर सुरू असताना परिवर्तन यात्रेत शिवसेना विरोधात बोलताना वैजापूरचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर म्हणाले, ‘भाजपने राजकारण करताना केलेले पाप शिवसेनेच्या साथीने केलेले आहे. त्यांना तीन वेळा सरकारचा पाठिंबा काढण्याची संधी होती. पण दरवेळी त्यांनी ती संधी गमावली. शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो, असे सांगितले होते. ती सरसकट मिळाली नाही, तेव्हा पाठिंबा काढता आला असता. व्यापाऱ्यांवर जीएसटी लावली, तेव्हाही बाहेर पडता आले असते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी केली, तेव्हा तरी शिवसेनेने सरकारची साथ सोडायला हवी होती, पण त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे भाजपच्या पापात शिवसेनाही तेवढीच सहभागी आहे.’ विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपच्या अच्छे दिनच्या घोषणेपासून ते हर हर मोदी ते घर घर मोदी या घोषवाक्यांची खिल्ली उडवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. असे करताना त्यांनी शिवसेनेवरही टोलेबाजी केली. पाच मंत्रिपदावर शिवसेना लाचार झाली. प्रत्येक पापात शिवसेनाही जबाबदार आहे. आता त्या वाघाला ना नख राहिले, ना सुळे राहिले आहे, असे म्हणत शिवसेनेला लक्ष्य केले. आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, धनंजय मुंडे आणि अजित पवार या तिघांचाही शिवसेना विरोधातील सूर वैजापूर येथील परिवर्तन यात्रेत उंचावल्याचे दिसून आले. या वेळी आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, अभय पाटील चिकटगावकर आदींची उपस्थिती होती.

मंत्रिमंडळात कोणी शेतकऱ्यांचे मूल नाही

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात शेतकऱ्यांचा एकही मुलगा नाही, अशी टीका करताना धनंजय मुंडे यांनी आवर्जून काही नावे घेतली. चंद्रकांतदादा पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश बापट, गिरीश महाजन, सुभाष देसाई हे कोणत्याही अंगाने पाहा, शेतकरी वाटतात का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री स्वत:ला पाच पिढय़ांपासून शेतकरी असल्याचे सांगत असले तरी त्यांना गायीच्या धारा काढता येतात, असे जरी म्हणत असले तरी त्यांना आता खाली बसून धारा काढता येणार नाही, या शब्दात त्यांनी टीका केली.

  .. तेव्हा चौकीदार कुठे होते?

कर्नाटकात सरकार पाडण्यासाठी काँग्रेसच्या मंत्र्यांना ६० कोटी रुपये आणि मंत्रिपद असे आमिष दाखवले जात आहे. एवढेच नाही तर मुंबईत मनसेचे नगरसेवक फोडताना एकेका नगरसेवकाला पाच-पाच कोटी रुपये दिले. एवढा पैसा यांनी आणला कोठून? तेव्हा चौकीदार कुठे होते, असा सवाल अजित पवार यांनी केला.